हनुमंत गुणाले जलसंपदाचे मुख्य अभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:48 AM2021-02-18T04:48:34+5:302021-02-18T04:48:34+5:30
सांगली : सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांची जलसंपदा पुणे विभागाच्या मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. त्यांच्या जागी ...
सांगली : सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले यांची जलसंपदा पुणे विभागाच्या मुख्य अभियंतापदी पदोन्नती झाली. त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची नियुक्ती झाली आहे. गुणाले यांच्याकडे मुख्य अभियंता पदभार आल्याने जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेची कामे मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
गुणाले यांनी गेल्या सहा वर्षांत सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची कामे मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जिल्ह्यातील शंभर टक्के लाभ क्षेत्राला पाणी देण्याची त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. बंद पाईपलाईनची योजनाही त्यांनीच राबविली. यामुळे राज्य सरकारचे पाचशे कोटी रुपयांचा निधी बचत झाला आहे. या निधीतून पाण्यापासून वंचित गावांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. बंद पाईपलाईनमुळे जमीन अधिग्रहणाचा खर्चही बचत झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांचे राज्यात आदर्श मॉडेल करण्यातही गुणाले यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची सध्या पुणे येथे जलसंपदा विभागाकडे मुख्य अभियंता म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. गुणाले यांची मुख्य अभियंतापदी पदोन्नतीबाबतचे आदेश बुधवारी प्राप्त झाले.
सिंधुदुर्गचे दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांची सांगली पाटबंधारे मंडळाकडे नियुक्ती झाली आहे. येत्या आठ दिवसांत ते पदभार स्वीकारतील, असे सांगण्यात आले.
चौकट
जत, खानापूरच्या विस्तारित योजना मंजूर होणार
जत तालुक्यातील वंचित गावांच्या विस्तारित सिंचन योजनेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे गेल्या अनेक दिवसांपासून पडून आहे. तसेच खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील आणि आटपाडी तालुक्यातील वंचित गावांसाठी विस्तारित योजना तयार केली आहे. हाही प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे तसाच आहे. हनुमंत गुणाले यांची जलसंपदाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती झाल्यामुळे जत, खानापूरच्या विस्तारित सिंचन योजनांना मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरज आहे ती नेत्यांनी पाठपुरावा करण्याची.