‘भूपाळी ते भैरवी’मध्ये रमल्या सखी

By Admin | Published: December 8, 2014 11:52 PM2014-12-08T23:52:47+5:302014-12-09T00:27:08+5:30

‘सखी मंच’तर्फे आयोजन : मऱ्हाठमोळ्या लोककलेच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Happy birthday to Bhumar from Bhairavi | ‘भूपाळी ते भैरवी’मध्ये रमल्या सखी

‘भूपाळी ते भैरवी’मध्ये रमल्या सखी

googlenewsNext

इस्लामपूर : जात्यावरील ओव्या, पिंगळ्याची भविष्यवाणी, हेळव्याने सांगितलेली पिढ्यान् पिढ्यांची माहिती, पंढरीची दिंडी अन् दमदार शाहिरीतून महाराष्ट्राचा बाज दाखविणाऱ्या ‘भूपाळी ते भैरवी’ या मराठी भावविश्वाच्या अंतरंगाचा ठाव घेणाऱ्या लोककलेच्या मैफलीत सखी सदस्या कधी डोलल्या, तर कधी भावूकही बनल्या.
‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने इस्लामपूर शहर व परिसरातील सखी सदस्यांसाठी जिव्हाळा प्रस्तुत व संपत कदम निर्मित ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक शिवाजी पवार, प्रकाश वाळवेकर, अशोक कापसे, विनोद मोहिते, गणेश परदेशी, सुप्रिया कांबळे, गीता पाटील, मंगल कापसे, सरोजनी मोहिते, शीतल राजमाने, उषा बावडेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
संपत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करताना महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणाऱ्या लोककलांचे सादरीकरण करीत सखी सदस्यांना याची देही याची डोळा मराठी ग्रामीण संस्कृतीची अनुभूती दिली. पावसाची चाहूल लागण्यापूर्वी गुबुगुबू’ करत येणारा नंदीबैल, तर पोतराजाच्या जीवनाचे दर्शन घडविणाऱ्या ‘कडक लक्ष्मी’ने सखींना अंतर्मुुख केले. ‘वाघ्या—मुरळी’च्या नृत्यावर सखी डोलल्या, तर लेक सासरी जातानाच्या गीतावर त्यांचे डोळेही पाणावले. ‘कोळीनृत्या’ने आपली अदाकारी दाखवली, तर ‘लावणी’चा ठसका सखींच्या पायांना ताल धरायला लावून गेला. मोटेवरच्या गाण्याने शेतकरी राजा—राणीची आठवण करुन दिली, तर बतावणीतून मोबाईल संस्कृतीला फटकारे ओढत वासुदेवाची स्वारी आनंद देऊन गेली.
बहुरुप्याच्या लग्नाच्या निमंत्रणाचा मान ठेवताना सखी पोटभर हसल्या. शेवटी ‘गायिली मी गायिली भूपाळी ते भैरवी गायिली’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कृष्णात पाटोळे यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. मिलिंद कांबळे, महेश नवाळे, सिकंदर पिरजादे, नरेंद्र हराळे, बाळासाहेब गणे, संजय घोलप, हेमंत थोरात, अभिजित कदम, अबोली कदम, अवधूत माने, जयश्री जाधव, रोहिणी आढाव, वैष्णवी जाधव, वर्षा जाधव, मोक्षदा कावले, कुणाल मसाले या कलाकारांच्या परिश्रमाने भूपाळी ते भैरवीचा साज चढला.
सखी मंच संयोजिकांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिओ फ्रेश शॉपीच्या विद्या गोडबोले, प्रकृती हेल्थ रिसॉर्टचे डॉ. भालचंद्र महामुनी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमास जियो फ्रेश यांचे प्रायोजकत्व लाभले. (वार्ताहर)

Web Title: Happy birthday to Bhumar from Bhairavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.