दवाखान्यासाठी माहेरून १५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी डॉक्टर विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 12:30 PM2022-07-18T12:30:33+5:302022-07-18T12:30:59+5:30
वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने माहेरी येत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
सांगली : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे दवाखाना सुरू करण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ करण्यात आल्याची फिर्याद पीडित डॉक्टर विवाहितेने दिली. पीडितेच्या फिर्यादीनुसार तिचा पती डॉ. अमोल रंगराव पाटील (३५), सासू माधवी रंगराव पाटील (५५), सासरे रंगराव आत्माराम पाटील (६३, तिघेही रा. पेठ वडगाव, जि. कोल्हापूर) व नणंद शीतल नीळकंठ पाटील (३०, रा. पिंपरी चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉक्टर असलेल्या पीडितेचे शहरातील संजयनगर परिसरात माहेर आहे. पेठवडगाव येथील डॉ. अमोल पाटील याच्याशी २०१५ मध्ये तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर तुला स्वयंपाक येत नाही, तू नागीण आहेस, तुझ्या माहेरचा पितृदोष आहे असे म्हणत सासरची मंडळी तिला हिणवत होते, असे पीडितेची तक्रार आहे.
पेठवडगाव येथे दवाखान्यासाठी माहेरून १५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी ही त्यांनी तगादा लावला होता. १५ लाख रुपये दिले नाहीत म्हणून पीडितेच्या आईवडिलांचाही ते अपमान करत होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने माहेरी येत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.