पाणचट चहा अन् बेचव नाश्ता, कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटीकडून प्रवाशांचा छळवाद

By संतोष भिसे | Published: March 11, 2023 06:14 PM2023-03-11T18:14:14+5:302023-03-11T18:14:47+5:30

अन्यत्र चांगल्या हॉटेलवर थांबा घेतल्यास चालक आणि वाहकाच्या वेतनातून प्रत्येकी ५०० रुपयांची दंडवसुली

Harassment of passengers by ST on Kolhapur Pune route with watery tea and beech snacks | पाणचट चहा अन् बेचव नाश्ता, कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटीकडून प्रवाशांचा छळवाद

संग्रहीत छाया

googlenewsNext

सांगली : कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील हॉटेल्स म्हणजे प्रवाशांच्या लुटमारीची केंद्रे बनली आहेत. खाद्यपदार्थांच्या किंमती दुपटीपेक्षा जास्त असून स्वच्छता व सेवेबद्दलही तक्रारी आहेत. `प्रवाशांच्या सेवेसाठी` ब्रीद असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रत्यक्षात प्रवाशांचा छळवाद सुरु आहे.

मिरज, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग विभागातील एसटी गाड्यांना पुण्याकडे जाताना नागठाणे व कापूरहोळ येथील हॉटेलांचा थांबा घ्यावा लागतो. परतीच्या प्रवासात पारगाव खंडाळा येथे थांबण्याची सक्ती आहे. प्रत्येक एसटीला थांब्याच्या मोबदल्यात हॉटेलचालकाकडून २७७ रुपये शुल्क मिळते. त्याशिवाय चालक-वाहकाला नाश्ता किंवा जेवणही मोफत दिले जाते.

हॉटेलचालक या सेवेची पुरेपूर परतफेड प्रवाशांकडून करुन घेतात. साखर-दूध नसलेला पाणचट चहा २० रुपयांना दिला जातो. इडली, वडासांबार, उडीदवडा या नाश्त्यासाठी ५० रुपये मोजावे लागतात. तोदेखील बेचव असतो. चहा-नाश्त्यासोबत वेटरची दादागिरी ऐकावी लागते. फसवणुकीच्या भावनेने प्रवासी चालक-वाहकाचा उद्धार करतात.

शिवशाही, साधी गाडी, आरामगाडी यांना हॉटेल्स वाटून दिली आहेत. नागठाणे येथील हॉटेलचा करार सन २०२५ पर्यंत आहे. तेथील सेवा आणि दर्जाविषयी महामंडळाकडे अनेकदा तक्रारी होऊनही एसटीने करार रद्दची तोशीस घेतलेली नाही.

प्रवाशांनी सांगितले की, पदार्थ अत्यंत निकृष्ट असतात. स्वयंपाकघर अस्वच्छतेने भरलेले असते. कर्मचारी उद्धटपणे वागतात. स्वच्छतागृहे नाहीत. जेथे आहेत, तेथे स्वच्छता नाही. महामंडळाने ठराविक हॉटेलांचा ठेका दिला असेल, तर तेथील दर्जा व स्वच्छतेची जबाबदारीही घ्यायला हवी. प्रत्येक हॉटेलमध्ये पदार्थांचे दर वेगवेगळे आहेत. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकाच स्वयंपाकघरात तयार केले जातात. सर्वाधिक तक्रारी नागठाणे येथील हॉटेलविरोधात आहेत.

चालक-वाहकांना दंड

याच विशिष्ट हॉटेलांवर थांब्याची सक्ती असल्याने चालक-वाहकांचाही नाईलाज असतो. अन्यत्र चांगल्या हॉटेलवर थांबा घेतल्यास चालक आणि वाहकाच्या वेतनातून प्रत्येकी ५०० रुपयांची दंडवसुली केली जाते. त्यामध्ये ९७ रुपयांचा जीएसटीही वाढवला जातो.

येथे करा तक्रार

प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा १८००२२१२५० हा टोल फ्री क्रमांक २४ तास सुरु असतो. हॉटेलविरोधातील तक्रारी त्यावर नोंदवता येतात. अन्य सर्व गैरसोयींविरोधातही दाद मागता येते. 

महामंडळाचा कारभार प्रवाशांना त्रासदायक आहे. या हाॅटेल्सवर नियंत्रणासाठी किंवा दंडात्मक कारवाईसाठी एसटीने कोणती पावले उचलली हे स्पष्ट व्हायला हवे. हॉटेलविरोधात तक्रारीसाठी तेथे कोणताही सूचनाफलक नाही.- राजेंद्र शाह, प्रवासी

Web Title: Harassment of passengers by ST on Kolhapur Pune route with watery tea and beech snacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.