सांगलीतील हरीपूर-कोथळी पुलाच्या जोडरस्त्याचा प्रश्न निकाली, १५ दिवसात रस्ता होणार पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 12:12 PM2023-11-24T12:12:08+5:302023-11-24T12:20:47+5:30

प्रतिहेक्टरी १२ लाख रुपयाने भूसंपादन, आकाशवाणीपासूनच्या रस्त्याचा तिढा कायम

Haripur-Kothli bridge link road in Sangli will be completed in 15 days | सांगलीतील हरीपूर-कोथळी पुलाच्या जोडरस्त्याचा प्रश्न निकाली, १५ दिवसात रस्ता होणार पूर्ण 

सांगलीतील हरीपूर-कोथळी पुलाच्या जोडरस्त्याचा प्रश्न निकाली, १५ दिवसात रस्ता होणार पूर्ण 

सांगली : हरीपूर - कोथळी पुलाच्या जोडमार्गाचा प्रश्न निकाली निघाला आहे. दोन्ही बाजूंच्या भरावासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या १५ दिवसात दोन्ही बाजूंचा रस्ता पूर्ण होणार आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या या पुलाचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष होत आले. मात्र त्याच्या भरावाची, जोडरस्त्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. पुलाच्या दोन्ही बाजूंना जोडरस्त्यासाठी खासगी शेतजमिनीची आवश्यकता होती. हा प्रश्न सोडविण्यात महसूल प्रशासन यशस्वी झाले असून, प्रतिहेक्टरी १२ लाख रुपये दर निश्चित केला आहे. त्या दराने हरीपूर बाजूला ८० मीटर लांबीसाठी २७ गुंठे जमीन संपादित केली आहे.

कोथळी बाजूला १७५ मीटर लांबीसाठी ८१ गुंठे जमीन ताब्यात घेतली आहे. सध्या दोन्ही बाजूंना खडीकरण सुरू असून, १५ दिवसात डांबरीकरणालाही सुरूवात होणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी अधिकृतरीत्या खुला होईल. भूसंपादनासाठी सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

शेतकऱ्यांनी मूल्यांकनाला मान्यता दिल्यानंतर खरेदीपत्रे सुरू झाली आहेत. कोथळी बाजूला सहा गट आहेत, तर हरीपूर बाजूला तीन गट आहेत. काही सातबाऱ्यांवर कर्जाचा बोजा असून, तो कमी करण्याची सूचना शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. त्यानंतरच तेथील खरेदीपत्रे पूर्ण होऊ शकतील. दोन गटांच्या मालकी हक्काविषयी न्यायालयात दावे सुरू आहेत. त्यांचे पैसे न्यायालयात जमा केले जाणार आहेत. वाद मिटल्यानंतर संबंधित जमीनमालकाला ते मिळतील.

आकाशवाणीपासूनच्या रस्त्याचा तिढा कायम 

सांगलीतून या पुलावर जाण्यासाठी हरीपूरमार्गे जावे लागते. आकाशवाणी शेजारून जाणारा रस्ता मुख्य आणि महत्त्वाचा आहे. त्याच्या भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे या पुलावरून तूर्त मोठ्या संख्येने वाहतूक सुरू होणार नाही, हे स्पष्ट आहे.

Web Title: Haripur-Kothli bridge link road in Sangli will be completed in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.