वृद्धाला ट्रकखाली ढकलणारा हरिपूरचा
By admin | Published: April 3, 2016 10:53 PM2016-04-03T22:53:18+5:302016-04-03T23:45:04+5:30
अखेर छडा : संशयितास अटक
सांगली : येथील शिवाजी मंडईजवळ एका वृद्धास डंपरखाली ढकलून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा संशयित हरिपूर (ता. मिरज) येथील असल्याचे रविवारी निष्पन्न झाले आहे. संतोष हणमंत खोत (वय २८, रा. मारुती मंदिरजवळ, हरिपूर) असे त्याचे नाव आहे. पंधरवड्यापूर्वी ही घटना घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावणे अत्यंत आव्हानात्मक होते. खोतला अटक करण्यात आली आहे.
अबीब महंमद यासीक शेख (वय ५०, रा. विश्रामबाग रेल्वे स्थानकाजवळ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. १५ मार्चला दुपारी एक वाजता शेख त्यांची पत्नी व विवाहित मुलगी शिवाजी मंडईजवळील बसस्थानकावर विश्रामाबागला जाण्यासाठी उभा होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात तरुणाने शेख यांच्या मुलीस पाचशे रुपयाचे आमिष दाखवित लॉजवर येण्यास सांगितले. या प्रकाराने ती संतप्त झाली. तिने या तरुणास चांगलेच झापले. हा प्रकार पाहून तिच्या शेख व त्यांच्या पत्नीने या तरुणास जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यावेळी तरुणाने शेख यांना धक्काबुक्की केली. यात ते रस्त्यावर पडले. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच त्याचदिवशी त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला होता.
याप्रकरी अज्ञात तरुणाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. भरदिवसा घडलेली ही घटना अनेकांनी पाहिली होती. पण प्रत्यक्षात पोलिसांना माहिती देण्यास कोणीच पुढे आले नव्हते. (प्रतिनिधी)
गोपनीय तपास
पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्या पथकाने या गुन्ह्यात गोपनीय तपास सुरु ठेवला होता. शिवाजी मंडईजवळ ही घटना घडल्याने संशयित शहर परिसरातील असावा, असा अंदाज होता. दोन दिवसापूर्वी आवटे यांना तरुणाच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला. त्याआधारे आरटीओ कार्यालयातून माहिती मागविल्यानंतर संतोष खोत याचे नाव पुढे आले. रविवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.