हरिपुरात मारामारी; पाच जखमी

By admin | Published: June 26, 2017 12:22 AM2017-06-26T00:22:17+5:302017-06-26T00:22:17+5:30

हरिपुरात मारामारी; पाच जखमी

Hariputra fights; Five injured | हरिपुरात मारामारी; पाच जखमी

हरिपुरात मारामारी; पाच जखमी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे राजकीय वर्चस्वाच्या वादातून बोंद्रे आणि फाकडे गटांत रविवारी सकाळी जोरदार मारामारी झाली. काठी, लोखंडी गजाने हल्ला करून तीन गाड्या फोडल्या. एकमेकांच्या घरावर दगडफेक केली. यामध्ये पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाच्या ६५ जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सहा संशयितांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये गजानन हरी फाकडे, अक्षय राजेंद्र कांबळे, वैभव परशुराम फाकडे, विकास मनोहर बोंद्रे, विनोद महादेव पवार, अभिषेक अण्णासाहेब बोंद्रे (सर्व रा. हरिपूर) यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या सागर गजानन फाकडे (वय २६), अनिल बाळू फाकडे (३९), सूरज नरसू फाकडे (२५), प्रकाश गोविंद फाकडे (४०) व सचिन गजानन फाकडे (२६, सर्व रा. हरिपूर) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हरिपुरात राजकीय वर्चस्व व दहशत कोणाची? यावरून बोंद्रे-फाकडे गटात गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. एकमेकांकडे रागाने पाहण्यावरूनही त्यांच्यात अनेकदा धुसफूस झाली आहे. तीन दिवसांपूर्वी अंकली (ता. मिरज) येथून बोंदे्र गटाचे समर्थक मोटारीतून कामानिमित्त चालले होते. त्यावेळी फाकडे गटाने त्यांच्या मोटारीच्या आडवी दुचाकी मारली होती. यावरून त्यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला होता. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यांना याप्रकरणी तक्रार देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले होते. पण दोन्ही गटाचे समर्थक तक्रार देण्यास पोलीस ठाण्याकडे फिरकले नाहीत. परिणामी, त्यांच्यातील धुसफूस वाढतच गेली. त्याचे पर्यवसान रविवारी सकाळी मारामारीत झाले. अंकलीतून सुरूझालेली मारामारी सांगलीत शास्त्री चौकापर्यंत सुरू होती. एकमेकांचा पाठलाग करून पकडून मारहाण केली. गाड्यांवर हल्ला करून त्याही फोडल्या.
बोंद्रे गटाकडून विकास मनोहर बोंद्रे (वय ३४) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन हरी फाकडे, सागर गजानन फाकडे, सूरज नासू फाकडे, नसरू हरी फाकडे, सचिन गजानन फाकडे, अनिल सदाशिव फाकडे, सुनील सदाशिव फाकडे, धीरज नरसू फाकडे, शुभम फाकडे, सौरभ परशुराम फाकडे, लखन फाकडे, परसू फाकडे, नीलेश फाकडे, नीरज फाकडे, अक्षय फाकडे, अरुण फाकडे, सनी फाकडे, शेखर फाकडे, चिकू फाकडे, प्रकाश फाकडे, अक्षय राजेंद्र फाकडे, संभाजी फाकडे यांची दोन मुले (नावे निष्पन्न नाहीत) व अनोळखी दहा ते पंधरा अशा ३७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विकास बोंद्रे व त्यांचे समर्थक मोटारीतून (क्र. एमएच १० सीपी ८०६४) सांगलीत कामानिमित्त येत होते. त्यावेळी संशयितांनी गावात राजकीय वर्चस्व व दहशत वाढविण्यासाठी त्यांच्या मोटारीवर काठ्या व लोखंडी गजाने हल्ला केला, मोटारीच्या काचा फोडल्या, मोटारीतील तिघांना मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फाकडे गटाकडून हरिपूरचे माजी उपसरपंच गजानन हरी फाकडे (५४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महेश दिनकर बोंद्रे, निशिकांत बोंद्रे, वीरेंद्र नारायण तांबवेकर, दिग्विजय कुंडलिक बोंद्रे, विकास मनोहर बोंद्रे, कुमार बोंद्रे, संतोष प्रकाश बोंद्रे, विनोद महादेव पवार, योगेश बोंद्रे, दामोदर इंदर बोंद्रे, अभिषेक अण्णासाहेब बोंद्रे, आशिष शामराव बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. गजानन फाकडे यांचा पुतण्या सनी फाकडे हा मोटारीतून (क्र. एचएच १२ एचएफ ४९८८) सांगलीत येत होता. बागेतील गणपती मंदिराजवळ तो आल्यानंतर संशयितांनी मोटार थांबवून लोखंडी गज व काठ्यांनी हल्ला केला. मोटारीच्या काचा फोडल्या. तसेच सनीसोबत अनिल फाकडे व सागर फाकडे होेते, त्यांनाही लाथा-बुक्क्या, काठी व गजाने बेदम मारहाण केली.

घरांवर दगडफेक
दोन्ही गटाने एकमेकांचा पाठलाग करून मारहाण सुरू केल्याने हरिपुरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावरील लोकांची भीतीने पळापळ झाली. दुकाने पटापट बंद झाली. ग्रामस्थांनी घराला आतून कड्या लावून घेतल्या होत्या. काही घरांच्या दरवाजावर लोखंडी पहारीने हल्ला करण्यात आला. दगडफेकही केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांची धरपकड सुरू केल्यानंतर तणाव निवळला. सांगली शहर, विश्रामबाग व संजयनगर पोलीस ठाण्यातील फौजफाटा तैनात केला होता. पोलीस मुख्यालयातील राखीव पोलिसांची तुकडीही तैनात केली होती.
अरविंद तांबवेकरांवरही गुन्हा
भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरविंद तांबवेकर व त्यांच्या मुलाविरुद्ध या मारामारीच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी उपसरपंच व फाकडे गटाकडून फिर्याद दिलेले गजानन फाकडे यांची मोटार बागेतील गणपती मंदिरासमोर फोडण्यात आली. याचठिकाणी तांबवेकर यांचे निवासस्थान आहे.
हरिपूर ते सांगलीच्या शास्त्री चौकापर्यंत राडा
बोंद्रे-फाकडे गटांत हरिपुरात सुरू झालेली मारामारी सांगलीच्या शास्त्री चौकापर्यंत आली. फाकडे गटाचा सचिन फाकडे (२६) व त्याचे वडील गजानन फाकडे हे मोटारीने (क्र. एमएच १० एक्यू १५५७) कोल्हापूर रस्त्यावरुन मुख्य बसस्थानकाकडे येत होते. शास्त्री चौकाजवळील साईनाथ अ‍ॅटोमोबाईल या दुकानासमोर आल्यानंतर बोंद्रे गटाने त्यांच्या मोटारीवर काठ्यांनी हल्ला केला. मोटारीची तोडफोड करून सचिन, त्याचे वडील व चुलतभाऊ सूरज यांना मारहाण केली. याप्रकरणी सचिनने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडू दिनकर बोंद्रे, दिग्विजय कुंडलिक बोंद्रे, विकास मनोहर बोंद्रे, युवराज बोंद्रे, आशिष शामराव बोंद्रे, अरविंद गोविंद तांबवेकर, कुमार बोंद्रे, योगेश बोंद्रे, सागर बोंद्रे, प्रतीक बोंद्रे, परशुराम बोंद्रे, सुनील साखळकर, अक्षय बाळासाहेब बोंद्रे, विनोद पवार, अभिनव अरविंद तांबवेकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Hariputra fights; Five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.