महापौरपदी हारुण शिकलगारच

By admin | Published: February 7, 2016 01:00 AM2016-02-07T01:00:41+5:302016-02-07T01:00:41+5:30

विजय घाडगे उपमहापौर : स्वाभिमानीचे आठजण काँग्रेसकडे; राष्ट्रवादीत फूट; भाजपचा सवतासुभा

Harun Shiklagaracha, the post of Mayor | महापौरपदी हारुण शिकलगारच

महापौरपदी हारुण शिकलगारच

Next

सांगली : सांगली, मिरज, कुपवाडच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे हारुण शिकलगार व उपमहापौरपदी विजय घाडगे यांची शनिवारी निवड झाली. त्यांना ४९ मते मिळाली. विरोधी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी आणि राजू गवळी यांना २३ मते मिळाली. त्यांची दोन मते फुटली. दोन्ही पदांसाठी अर्ज भरलेल्या भाजपच्या स्वरदा केळकर यांना केवळ पाच मतांवर
समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी व स्वाभिमानीतील पाच सदस्यांनी भाजपच्या झेंड्याखाली सवतासुभा मांडला, स्वाभिमानी विकास आघाडीच्या आठजणांनी काँग्रेसला बळ दिले.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा झाली. महापालिकेत काँग्रेसचे ४१, राष्ट्रवादीचे २५, तर स्वाभिमानी आघाडीचे ११ सदस्य आहेत. गेले चार दिवस काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने संघर्षाची चिन्हे होती; पण शुक्रवारी आमदार पतंगराव कदम, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी बंडखोर गटाचे नेते सुरेश आवटी यांच्याशी चर्चा केली. आवटी यांना दहा महिन्यांनंतर महापौरपद देण्याचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी बंड मागे घेतले. त्यामुळे शनिवारी निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक होती.
सुरुवातीला महापौरपदाच्या अर्जाची छाननी झाली. यासाठी काँग्रेसमधून हारुण शिकलगार, बंडखोर निरंजन आवटी, राष्ट्रवादीतून दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, मैनुद्दीन बागवान, तर स्वाभिमानीतून स्वरदा केळकर यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीवेळी केळकर यांनी शिकलगार व आवटी यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. या दोघांनीही वेळ संपल्यानंतर अर्ज भरले आहेत, त्यात निवडणूक कार्यालयातील घड्याळातील काटे फिरवून वेळ बदलल्याची तक्रार त्यांनी केली. या तक्रारीच्या पुष्टीसाठी त्यांनी तीन व्हिडिओ क्लिपही सादर केल्या. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या एका खटल्याचा निकालही सादर केला. या आक्षेपामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. या आक्षेपावर गटनेते किशोर जामदार, उमेदवार शिकलगार, सुरेश आवटी, संतोष पाटील यांनी म्हणणे मांडले. सर्वांनीच वेळेत अर्ज दाखल झाल्याचा दावा केला. त्यानंतर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केळकरांची तक्रार फेटाळून लावली. तक्रार फेटाळल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला.
त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. या वेळेत निरंजन आवटी, मैनुद्दीन बागवान, विष्णू माने यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौरपदासाठी हारुण शिकलगार, दिग्विजय सूर्यवंशी व स्वरदा केळकर यांचे अर्ज बाकी राहिले. एकेका उमेदवाराच्या नावाची घोषणा करीत मतदान घेण्यात आले. यात शिकलगार यांना ४९, सूर्यवंशी यांना २३, तर केळकर यांना पाच मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसला स्वाभिमानी आघाडीने साथ दिली. आघाडीच्या आठ सदस्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले, तर आघाडीतील तीन सदस्य केळकर यांच्या पाठीशी राहिले. राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य धनपाल खोत, सुलोचना खोत यांनी केळकर यांना साथ दिली.
महापौर निवडीनंतर उपमहापौर निवडीची प्रक्रिया झाली. या पदासाठी काँग्रेसकडून विजय घाडगे, बंडखोर प्रदीप पाटील, राष्ट्रवादीतून राजू गवळी, संगीता हारगे, आघाडीच्या संगीता खोत, भाजपच्या स्वरदा केळकर यांनी अर्ज दाखल केले होते. बंडखोर प्रदीप पाटील, हारगे, खोत यांनी अर्ज मागे घेतले. उपमहापौरसाठी तीन अर्ज राहिल्याने मतदान झाले. यातही महापौर निवडीप्रमाणेच मते मिळाली. घाडगे यांना ४९, राजू गवळी यांना २३, तर केळकर यांना पाच मते पडली. या निवडीनंतर शिकलगार, घाडगे यांच्या समर्थकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Harun Shiklagaracha, the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.