घडलंय आणि बिघडलंयही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:10 AM2018-09-19T00:10:22+5:302018-09-19T00:11:26+5:30
श्रीनिवास नागे
लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजपमधली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय (की आणलीय?). खासदार संजयकाका पाटील यांचे एकेकाळचे साथीदार गोपीचंद पडळकर यांनी काकांवर तोंडसुख घेत भाजपला रामराम केला. त्यावर काकांनीही त्यांना अदखलपात्र ठरवत मोडीत काढलं. काकांना पुन्हा लोकसभेचं बाशिंग बांधून भाजपमध्ये निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली असतानाच पडळकरांचा कोंडमारा कसा बाहेर पडला, भाजयुमोचं जिल्ह्याचं अध्यक्षपद आणि भावाला जिल्हा परिषदेचं सभापतीपद देऊनही त्यांनी काडीमोड का घेतला, जिल्ह्यात भाजपचा एकही नेता लायकीचा नसल्याची तोफ त्यांनी कशी डागली, असे सवाल पुढं येत असतानाच हे स्वाभाविकपणे घडलंय-बिघडलंय की, मुद्दाम घडवलंय, असा संशयकल्लोळही निर्माण झालाय.
मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी संजयकाका भाजपमध्ये आले. लोकसभेचं तिकीट मिळवून खासदारही झाले. भाजपमधल्या दुढ्ढाचार्यांना आणि तथाकथित निष्ठावंतांना काही कळण्याआधीच सारं घडलं. (पुढं तंबूत शिरलेल्या उंटानं तंबूच पळवून नेला, तशासारखी अवस्था झाल्याचं दबक्या आवाजात बोललं जाऊ लागलं.) आटपाडीतल्या पडळकरवाडीतले गोपीचंद पडळकर तसे संजयकाकांआधी भाजपमध्ये आलेले. त्यापूर्वी काही दिवस आधीच त्यांनी महादेव जानकरांच्या ‘रासप’ला ‘गुडबाय’ केलेला. खरं तर ते जानकरांच्या ‘नेटवर्क’मधून कंत्राटदारीत गेलेले आणि ‘जेसीबी’च्या खोऱ्यानं कमाई केलेले... काका खासदार झाल्यानंतर पडळकर त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसू लागले. पुढं विधानसभेला खानापूर-आटपाडीतून पडळकर भाजपकडून लढले. तिसºया क्रमांकाची ४४ हजारावर मतं मिळवली, पण त्यावेळी काकांनी त्यांना तोंडावर आपटलं म्हणे! (‘गोपी की टोपी’, हा प्रश्न तेव्हाच काकांना पडला होता आणि त्यांनी विट्याच्या सदाभाऊंच्या पारड्यात माप टाकलं होतं.) नंतर तर पडळकर महामंडळ मागणाºयांच्या रांगेत दिसू लागले, पण कसलं काय! काकांनी शब्द पाळला नाही, मदत केली नाही. त्यांच्या थोरल्या बंधूराजांना जिल्हा परिषदेत सभापतीपदाची लॉटरी लागली, तेवढीच. परिणामी दोन-तीन वर्षांपासून ते काकांवर खार खाऊन आहेत.
धनगर समाजाचं ‘कार्ड’ वापरून पडळकरांनी आटपाडी-खानापुरातील तरुणवर्ग खेचण्याचा प्रयत्न केला. माळेतले फटाके उडावेत, असं पडळकरांचं वक्तृत्व. पैसेवाली पार्टी. त्यात सत्ताधारी भाजपमध्ये मोठी ऊठबस. त्यामुळं तरणी पोरं भुलली नसती तरच नवल! पण पदरात काहीच पडलं नसल्यानं पडळकरांची अस्वस्थता वाढलीय. शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे या आमदारांसोबत अजितराव घोरपडेही असेच अस्वस्थ दिसतात. (त्यांनाही काकांच्या अडथळ्यामुळं काही मिळालेलं नाही हो!) अर्थात संजयकाकांनी पक्षात आल्यानंतर बस्तान तर बसवलंच, पण दुसºयांचा गट पोखरून स्वत:चा गट वाढवत नेल्यानंही हे सगळे त्यांच्यावर डोळे वटारत असतात. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांचा तर काकांशी छत्तीसचा आकडा. खासदार संजयकाका आणि जतचे आमदार विलासराव जगताप एकीकडं, तर पक्षातले बाकीचे नेते दुसरीकडं, असं चित्र नेहमीचंच. त्यात महसूलमंत्री तथा पश्चिम महाराष्टÑातील भाजपचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काकांची कायमचीच जिरवायची, असा जणू ‘पण’च केलाय... जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून महापालिका निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी काकांना बाजूला ठेवलं. पण लोकसभेला भाजपकडं काकांशिवाय तगडा गडी नसल्यानं दादा शांत झालेत. (असं दिसतंय तरी!)
चंद्रकांतदादा-संजयकाकांनी एकमेकांशी जुळवून घेतलंय, असं वाटत असतानाच काकांना मुख्यमंत्र्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद आणि पाठोपाठ कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जाही बहाल केला. मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांतदादांवर केलेली ही कुरघोडी की, काँग्रेस-राष्टÑवादीकडं चाललेल्या संजयकाकांची नाराजी दूर करण्यासाठी दिलेली भेट, कुणास ठावूक! पण झालं! भाजपमधल्या नाराजांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलं! आटपाडीतले राजेंद्रअण्णा आणि अमरसिंह देशमुख आधीच भाजपमध्ये आलेत, त्यातच सदाभाऊ पाटलांना विधानसभेसाठी पायघड्या घातल्यात जाताहेत. या सगळ्यातूनच पडळकरांची खदखद बाहेर पडली.
जाता-जाता : गोपीचंद पडळकरांनी आता ‘आरक्षण हाच माझा पक्ष’, अशी घोषणा केलीय. त्यासाठी आॅक्टोबरमध्ये त्यांनी आरेवाडीतल्या बिरोबाच्या बनात आरक्षणाची महाआरती ठेवलीय. त्यावेळी ते घंटा वाजवतील... ती काकांसाठी धोक्याची आणि भाजपमधल्या काकांच्या विरोधकांसाठी फायद्याची ठरणार... की इतरांच्या इशाºयावर नुसतीच किणकिण वाजत राहणार, हे दिसेल, लवकरच.