Sangli: चांदोली धरणात गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी ३.१२ टीएमसीने पाणीसाठा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:08 PM2024-05-29T16:08:49+5:302024-05-29T16:09:32+5:30
आनंदा सुतार वारणावती : चांदोली धरणात सध्या ११.३० टीएमसी इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास ...
आनंदा सुतार
वारणावती : चांदोली धरणात सध्या ११.३० टीएमसी इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास ३.१२ टीएमसीने पाणीसाठा यंदा कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात १४.४२ टीएमसी इतका एकूण पाणीसाठा होता. मात्र आज रोजी धरणात केवळ ११.३० टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे.
चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ही ३४.४० टीएमसी इतकी असून सध्या धरणाची पाणी पातळी ३२०.०७ मीटर इतकी असून उपयुक्त पाणी साठा १२५.२३ दशलक्ष घनमीटर सध्या उपलब्ध आहे. तर गत वर्षी धरणाची पाणी पातळी ६०२.२८ मीटर इतकी असून २०४.४८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा होता. मृत संचय (डेड वॉटर स्टॉक) ६.८८ टीएमसी इतका आहे.
सध्या कालव्याद्वारे २०० क्युसेक्स तर नदी पात्रात ८८५ क्युसेक असा एकूण १०८५ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणातून वीज निर्मिती केंद्रातून तसेच वारणा नदी, वारणा डावा कालवा व वाकुर्डे उपसा सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडले जाते. पाण्याच्या मागणीत वाढ होणार आहे. तरी सुद्धा चांदोली धरणामध्ये क्षमतेपेक्षा ३२.८५ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीला धरणात उपलब्ध आहे. जूनअखेर पावसाने दडी मारली तरी धरण प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करून पाण्याचे काटेकर पणे नियोजन करण्यात येत आहे.
पुरेसा पाणीसाठा उपलब्ध
सध्या धरणात ३२.८५ टक्के पाणी साठा उपलब्ध असून उपयुक्त पाणीसाठा १६.०७ टक्के आहे. उपयुक्त पाणीसाठा हा सिंचन क्षेत्रासाठी केला जाणारा पाणी उपसा पाहता सद्यस्थितीला पाणीसाठा पुरेसा उपलब्ध आहे. - मिलिंद किटवाडकर उप विभागीय अभियंता वारणा कालवे विभाग