आवक वाढल्याने हळदीच्या दराची अग्निपरीक्षा...
By admin | Published: January 24, 2017 12:52 AM2017-01-24T00:52:47+5:302017-01-24T00:52:47+5:30
दर आणखी गडगडणार : प्रतिकूल परिस्थितीमुळे सांगलीच्या बाजारपेठेत हळद रुसण्याची चिन्हे
प्रताप महाडिक ल्ल कडेगाव
जिल्ह्यात सर्वत्र हळद पिकाच्या काढणीची लगबग सुरू झाली आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने हळदीला अल्प दर दिला जात आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शासकीय गोदामे, शीतगृहे, तसेच खासगी गोदामात सुमारे साडेतीन लाख क्विंटल जुनी हळद शिल्लक आहे. आता यंदा सांगलीच्या बाजारपेठेत १० ते १२ लाख क्विंटल हळदीची आवक होण्याची शक्यता आहे. जुन्या हळदीचे दरही गडगडलेले असतानाच आवक वाढल्याने नव्या हळदीचे दरही घसरण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या बाजारपेठेत मागीलवर्षी आडेआठ लाख क्विंटल हळदीची आवक झाली होती. यंदा चांगला पाऊस आणि हवामानामुळे उत्पादनात वाढ झाली. सांगलीत सातारा, हिंगोली, नांदेड, जळगाव जिल्ह्यांसह कर्नाटक, सेलम, निजामाबाद येथून हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होते.
यावर्षी २६ जानेवारीनंतर सांगलीच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात हळद येणार आहे. प्रारंभीच्या सौद्याला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आवकेच्या मोठ्या ढिगाऱ्यात होणाऱ्या दराच्या अग्निपरीक्षेत हळद तरणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निर्यातीवर निर्बंध नाहीत
हळद निर्यातीवर सरकारने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. तरीही हळदीची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. हळदीचे औषधी व आयुर्वेदिक महत्त्व अधिक आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने यात लक्ष घातले, तर निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हळदीला रामराम
गेल्या अनेक वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी निराश होऊन चालूवर्षी बियाणांसहीत हळद शिजवली आहे. हे शेतकरी आता कंटाळून हळदीला कायमचा रामराम ठोकून अन्य पिके घेण्याच्या विचारात आहेत.