मन में (नहीं) है विश्वास! - समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:36 PM2017-11-22T23:36:50+5:302017-11-22T23:37:20+5:30

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे.

Have faith in (not) in mind! - Sambhavan | मन में (नहीं) है विश्वास! - समाजभान

मन में (नहीं) है विश्वास! - समाजभान

googlenewsNext

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू अन् तो लपविण्यासाठी पोलिसांनी केलेले कृत्य यामुळे पोलीस दलाला तर काळिमा फासला गेला आहेच, शिवाय पोलिसांबद्दल जनतेत असलेल्या विश्वासालाही तडा गेला आहे. न्यायालय, पोलीस आणि दवाखाना कुणाच्याही मागे लागू नये असे म्हणतात, हे खरेच आहे. कारण पैसा आणि वेळ यामध्ये किती खर्च होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. तरीही सर्वसामान्यच काय श्रीमंतांनाही वेगवेगळ्या कारणांवरून या तिन्ही कार्यालयांची पायरी चढावीच लागते. न्यायालयांबद्दल विश्वास टिकून आहे. रुग्णालयात पैसा खर्च झाला तरी आजार बरा होऊन माणूस सुखरूप घरी परत आल्याचे समाधान मिळते. पोलिसांचे ब्रीदवाक्यच आहे की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’. या ब्रीदवाक्याला जागणारे पोलीस आणि अधिकारी आजही आहेत. परंतु, युवराज कामटेसारखे अधिकारी पोलीस दलासच खलनायकाच्या किंवा असुराच्या रूपात समाजासमोर आणतात. यामुळे या समाजात असलेला विश्वास आणि दबदबा घालविण्याचे काम करतात. याचा परिणाम संपूर्ण दलाला भोगावा लागतो. पोलीस दलाचेही नैतिक खच्चीकरण झाल्यासारखे होते.

सांगलीतील प्रकरणात आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या विरोधात आवाज उठविणाºयांची, तक्रार करणाºयांची संख्याही वाढल्याचे दिसते. पोलिसांकडून या ना त्या कारणांनी दुखावलेली काही मंडळीही असतात. पोलिसांनी निष्कारण त्रास दिला किंवा आपल्याला अडकविले, अशी भावना झालेली (कदाचित ते खरेही असू शकते.) काही मंडळीही असतात. त्यांना त्यावेळी आवाज उठवायला संधी मिळालेली नसते, ते अशावेळी आपल्यावरील अन्यायाबद्दल आवाज उठवितात. गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे लोकही पोलिसांवरील राग काढण्यासाठी अशावेळी सरसावतात. कारण, त्यांनीही कधी ना कधी पोलिसांचा ‘प्रसाद’ घेतलेला असतो. त्यामुळे एकूण समाजातच पोलिसांविरोधात वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळते. सांगली प्रकरणानंतर ते दिसतेच आहे. अनिकेत कोथळेच्या बाबतीत बोलायचे झाले, तर पोलिसांनी थर्ड डिग्री देणे यात नवे काही नाही. गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी अशा प्रकारच्या हत्याराचा वापर केला जातो. परंतु, या मारहाणीत थेट त्याचा मृत्यू होणे हे मान्य नाही.

सांगलीपाठोपाठ लातूर येथेही गुजरातमधील एका व्यापाºयाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या घटनाही अपवादाने घडतात. एका अहवालानुसार, जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात महाराष्ट्रात पोलीस कोठडीत मरण पावलेल्यांची संख्या २२ होती. ती देशात सर्वाधिक होती. त्याखालोखाल गुजरातमध्ये पोलीस कोठडीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. देशातील पोलीस कोठडीतील मृतांची संख्या १३३ होती. यावरून पोलीस कोठडीतील मृत्यू नवा नाही; पण हा मृत्यू लपविण्यासाठी जे काही झाले ते महाराष्ट्रातच काय देशात प्रथमच झाले असावे! या घटनेमुळे पोलिसांनी आरोपींना किंवा संशयितांना मारहाण करावी की नाही? थर्ड डिग्री वापरावी की नाही, यावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे पोलीसही आता सावध झाले आहेत. एखाद्या संशयिताला मारहाण करताना त्यांना दहावेळा विचार करावा लागत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तर अटक केलेल्या आरोपीकडून माहिती मिळविण्यासाठी मारहाण करू नका, वैज्ञानिक पद्धती वापरून त्यांना बोलते करा, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना बजावले असल्याचे समजते. वैज्ञानिक पद्धतींमध्ये लाय डिटेक्टर चाचणी, पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग चाचणी आणि नार्को टेस्ट यासारख्या हत्यारांचा समावेश होतो. पोलीस यातून बोध घेतील आणि संशयित गुन्हेगारांची तपासणी अशा पद्धतीने करतील. त्यामुळे कोठडीत मृत्यू होणार नाही, अशी आशा बाळगायला हरकत नाही. अनिकेत कोथळे प्रकरणाने एक झाले आहे की, पोलिसांवरील जनतेचा विश्वास जसा कमी झाला आहे, तसाच एखादी कारवाई आपल्या अंगलट येईल की काय, अशी एक अनामिक भीती पोलिसांमध्येही निर्माण झाली आहे. त्यांचाही विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळेच ‘मन में (नहीं) है विश्वास’ असे म्हणावेसे वाटते.

Web Title: Have faith in (not) in mind! - Sambhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.