संभाव्य पूरस्थिती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:38+5:302021-05-29T04:21:38+5:30
सांगली : यंदाच्या मान्सूनला लवकरच सुरुवात होत आहे. त्यात हवामान विभागाने ९८ ते १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ...
सांगली : यंदाच्या मान्सूनला लवकरच सुरुवात होत आहे. त्यात हवामान विभागाने ९८ ते १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करावे. अगोदरच नियोजन करून त्याची अंमलबजावणी करीत पूरस्थिती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूलसह पाटबंधारे, जिल्हा परिषदेसह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, सध्या कोरोनामुळे प्रशासन सदैव सतर्क आहे. कोरोना संसर्ग रोखण्याबरोबरच संभाव्य पूरपरिस्थितीही हाताळणे ही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून काम करावे. पुरावेळी प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेल्या साहित्याची तज्ज्ञांकडून तपासणी करवून घ्यावी. जिल्ह्यात असलेल्या १०४ पूरबाधित गावांसाठी अगोदरच आराखडा तयार करून ठेवल्यास पुढील अडचणी येणार नाहीत.
पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्याही नियंत्रणावर लक्ष दिल्यास पुराची बाधा रोखता येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करावे; तर आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लसीकरणासह पूरस्थितीवेळीही उपचाराचे नियोजन करावे, अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.