संतापजनक! दुसरीही मुलगी झाली म्हणून पत्नीस मारहाण करत घरातून हाकलले, बुधगावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:13 PM2022-06-10T13:13:19+5:302022-06-10T13:13:44+5:30
या प्रकरणी जयश्री नेताजी पाटील यांनी पती नेताजी तानाजी पाटील याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
सांगली : बुधगाव, तालुका मिरज येथे पहिली मुलगी असताना दुसरीदेखील मुलगीच झाल्याच्या रागातून पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवार दि. ७ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बुधगाव येथे घडला. या प्रकरणी जयश्री नेताजी पाटील यांनी पती नेताजी तानाजी पाटील (वय ३५, रा. बुधगाव) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी जयश्री पाटील यांचा विवाह बुधगाव येथील नेताजी पाटील यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर कालांतराने दुसऱ्यांदा देखील मुलगीच झाल्याने नेताजी नाराज होता. मंगळवार, दि. ७ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जयश्री पाटील या घरामध्ये काम करत असताना संशयित नेताजी पाटील हा तिथे आला. तुला दुसरी पण मुलगीच झाली आहे असे म्हणत शिवीगाळ करू लागला. तू अजून घरात का राहत आहेस, निघून जा असे म्हणाला.
वाद वाढत गेल्यानंतर नेताजी याने स्वयंपाक खोलीतील मिक्सरचे भांडे हातात घेऊन शिवीगाळ करत भांडे डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या प्रकारानंतर जयश्री पाटील यांनी पोलिसांत फिर्याद केली. त्यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या नेताजी पाटील याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.