घरफोडीतील माल विकण्यासाठी आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला
By शीतल पाटील | Published: November 10, 2023 07:33 PM2023-11-10T19:33:06+5:302023-11-10T19:33:12+5:30
संशयित कऱ्हाडमधील, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
सांगली: घरफोडीतील मुद्देमाल विक्रीसाठी कडेगाव तालुक्यातील खंबाळे फाटा येथे आलेल्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इब्राहिम अब्बासअली शेख (वय २४, रा. सूर्यवंशी मळा, कऱ्हाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी मालमत्तेविरूद्धच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली खास पथक नियुक्त केले आहे. हे पथक विटा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना इब्राहिम शेख हा घरफोडीतील दागिने विकण्यासाठी मोटारसायकलीवरून खंबाळे फाटा (ता. कडेगाव) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खंबाळे फाटा येथे सापळा रचला. इब्राहिम शेख येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता खिशात रोख ३१ हजार रुपये मिळून आले.
तर मोटारसायकलवरील पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने व २१ हजार रुपये मिळाले. याबाबत चौकशी केली असता शेख याने सोनकिरे व भाळवणी रोड, विटा येथील घरफोडीतील मुद्देमाल असल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांचे दागिने, ३० हजार ८७५ रुपयांचे चांदीचे दागिने, ६० हजार रुपये रोख आणि ६० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपासासाठी शेख याला विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
इब्राहिम शेख सराईत गुन्हेगार
इब्राहिम शेख हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर कासेगाव, विटा पोलिसांसह सातारा जिल्ह्यातील उब्रंज, कऱ्हाड पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.