वन्यजीवांसाठी त्यांनी तयार केला पाणवठा

By admin | Published: May 28, 2016 12:06 AM2016-05-28T00:06:05+5:302016-05-28T00:53:24+5:30

पाण्याचे स्रोत बंद : युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उपक्रम

He created wild animals for them | वन्यजीवांसाठी त्यांनी तयार केला पाणवठा

वन्यजीवांसाठी त्यांनी तयार केला पाणवठा

Next

 मानाजी धुमाळ -- रेठरेधरण
उन्हाचा तडाखा व दुष्काळाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे स्त्रोत बंद झाले असताना तहानलेल्या पशु-पक्षी व प्राण्यांच्या जिवांची तडफड पाहून रेठरेधरण (ता. वाळवा) येथील सतत विधायक कार्यात सहभागी असणारे युवक मदन पाटील व झुंझार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डोंगरातील वन्यप्राणी व पशु-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगरपायथ्याशी पाणवठा करुन मुक्या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी एक आदर्शवत उपक्रम केला आहे.
रेठरेधरण येथील गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या परीटकी नावाच्या माळरानाजवळ डोंगरातून पाण्यासाठी भटकणारे ससा, कोल्हा, लांडगा, तरस हे वन्यप्राणी तसेच मोर, लांडोर, चिमण्या व कावळे या पक्ष्यांना सिमेंटच्या टाकीमध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ््यामध्ये अनेक पक्षी व प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत असताना, या प्राण्यांवर दया दाखवून आपल्यातील एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न युवकांनी केला आहे. परीटकी नावाच्या क्षेत्राजवळ ओढा व विहिरी आहेत, पण यंदा पाणी आटल्यामुळे रात्रीच्या वेळेस प्राणी पाणी पिण्यासाठी शोधाशोध करुन थकून जायचे. त्यामुळे मदन पाटील व झुंझार गणेश मंडळातील कार्यकर्ते रघुनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, विजय कवठेकर, दत्तात्रय कदम, भरत कदम, अक्षय पाटील, रोहित सुतार, वैभव पाटील या युवकांनी वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मदन शिवाजी पाटील यांच्या विहिरीतून पाईपद्वारे पाणी कुंडात भरले जाते. माळावर दोन ठिकाणी प्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली आहे.
परीटकीकडे जाणाऱ्या व रस्त्यालगत रंगराव कापसे व सुभाष कापसे यांनीदेखील विहिरीचे पाणी सिमेंट कुंडामध्ये ठेवले आहे. या पाणवठ्याचा उपयोग प्रामुख्याने मोर, लांडोर यांना होत आहे. युवकांकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे प्राण्यांची सोय होत असून, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

Web Title: He created wild animals for them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.