‘तो’ दलाल बांगला देशात पसार

By admin | Published: July 9, 2015 11:32 PM2015-07-09T23:32:49+5:302015-07-09T23:32:49+5:30

पोलिसांना संशय : पुन्हा सांगलीत येण्याची शक्यता

'He' Dalal migrated to Bangladesh | ‘तो’ दलाल बांगला देशात पसार

‘तो’ दलाल बांगला देशात पसार

Next

सांगली : येथील गोकुळनगरजवळील संजय गांधी झोपडपट्टीत बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह सापडलेला ‘तो’ दलाल मुलीला घेऊन बांगला देशमध्ये पसार झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध तक्रार नसल्यामुळे शोध कसा घेणार, असा सवाल पोलीस करीत आहेत. त्याची मुलगी सांगलीत एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्यासाठी तो पुन्हा येण्याची शक्यता आहे. यासाठी आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात हा दलाल सापडला होता. त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगी सापडली होती. ही मुलगी आणि तोही बांगला देशमधील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या मुलीस तो वेश्या व्यवसायासाठी घेऊन आल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी त्यास पकडून बेदम चोप देऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही मुलगी पुतणी असल्याचे सांगितले होते. यासंदर्भातील पुरावेही देतो, असे सांगून त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. पोलीस कारवाईचा ससेमीरा मागे लागू नये, यासाठी त्याने त्याच रात्री मुलीस घेऊन सांगलीतून पलायन केले होते. मात्र पोलिसांशी ‘अर्थ’पूर्ण तडजोड करून त्याला सोडविण्यात एका नगरसेवकाचा हात असल्याची चर्चाही सुरू आहे.
वास्तविक पोलिसांनी ही मुलगी कोण आहे, याचा उलगडा झाल्याशिवाय त्याला सोडलेच कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविले होते. पत्की यांच्या पथकाने झोपडपट्टीतील रहिवाशांचे जबाब नोंदवून घेतले. दलालाचा शोध घेण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने शोधमोहीम थांबली. ज्या खोलीत तो राहत होता, तेथे त्याचे साहित्य आहे. तसेच त्याची मुलगी सांगलीतील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे.
साहित्य नेण्यासाठी तसेच मुलीच्या शिक्षणासाठी तो पुन्हा येईल, असे पोलिसांना वाटते. तो येताच त्याच्याकडे चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)


सोडून दिल्याची चूक
झोपडपट्टीतील रहिवाशांनी संबंधित दलालास पकडून देऊनही पोलिसांनी केवळ चौकशीचे नाटक करून अवघ्या अर्ध्या तासात त्याला सोडून दिले. सारा घटनाक्रम समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. यानंतर मात्र विश्रामबाग पोलिसांची भंबेरी उडाली आहे. त्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर तो गायब झाल्याची माहिती मिळाली. तो सापडत नसल्याने त्याला सोडून दिल्याची मोठी चूक झाल्याची कबुली पोलीस देत आहेत. जिल्ह्यात तपासकामी विश्रामबाग पोलिसांचा एक प्रकारचा दबदबा आहे. असे प्रकरणही त्यांना नवीन नाही. तरीही या प्रकरणात मात्र त्यांचा हलगर्जीपणा झालाच कसा?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: 'He' Dalal migrated to Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.