Sangli: खून झाल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती, उत्तरप्रदेशच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
By शीतल पाटील | Published: August 11, 2023 02:34 PM2023-08-11T14:34:04+5:302023-08-11T14:34:19+5:30
दारूच्या नशेत पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले
कुपवाड : नागरीकांच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या ११२ क्रमांकावरून मिरज एमआयडीसीत खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदीप धुपेंद्रसिंह पटेल (वय ३६, सध्या रा. सुपर क्राॅप्ट कंपनी समोर मिरज एमआयडीसी. मूळ गाव गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री मिरज एमआयडीसीतील एका कारखान्यातून संशयित सुदीप पटेल या तरुणाने ११२ या नंबरवर मिरज एमआयडीसीतील सुपर क्राॅप्ट या कंपनीजवळ खून झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कुपवाड व मिरज या दोन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना तेथे काहीही आढळून आले नाही. पोलिसांनी संशयित सुदीप पटेल याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी परिसरातील झाडेझुडपे आणि काट्याकुट्यात कसरतीची पायपीट करत बारकाईने शोध घेतला असता त्यांना एकजण मद्यधुंद अवस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता मीच फोन केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच इथे काही घडले नाही तुम्ही परत जा असे पोलिसांना त्याने सांगितले.
दरम्यान, संशयिताने कोणतीही घटना घडली नसताना दारूच्या नशेत पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या न घडलेल्या घटनेची खोटी माहिती देत पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल त्या तरूणाच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. निष्कारण झालेल्या त्रासाबद्दल पोलिसांनी संशयिताचा चांगलाच पाहुणचार केला.