उसानं मारलं, आता हळद तारणार का?
By admin | Published: January 15, 2015 10:59 PM2015-01-15T22:59:37+5:302015-01-15T23:22:36+5:30
शेतकऱ्यांचे दराकडे डोळे : २१ जानेवारीपासून हळद सौद्यास प्रारंभ
प्रताप महाडिक -कडेगाव -कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस दिला; परंतु सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र १९०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऊसदराच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अजूनही कारखानदार एफआरपीप्रमाणे दर देतील, अशी आशा बाळगून असलेला शेतकरी ऊस दरात मारला. आता हळद तरी तारणार का? या चिंतेत आहे.
कडेगाव तालुक्यात उसाबरोबर हळद उत्पादन घेणारे हजारो शेतकरी आहेत. हे शेतकरी हळद कापणे, खांदणे, शिजवणे, पॉलिश करणे अशा कामात व्यस्त आहेत. शेतात काबाडकष्ट सुरू आहे; परंतु डोळे मात्र २१ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या हळद सौद्यात दर किती निघतोय, याकडे लागले आहेत.
साखर कारखान्यांनी दिलेल्या ऊसबिलातून उत्पादन खर्चाइतकी रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीककर्जही या बिलातून परतफेड झाले नाही. कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी उसाबरोबरच हळद उत्पादनही घेतात. हे शेतकरी चार वर्षांपासून सातत्याने हळद दर घसरल्याने बेजार झाले आहेत. यावर्षी चांगला दर मिळेल, असे देशातील सर्वात मोठे हळद मार्केट असलेल्या सांगलीतील व्यापारी सांगत आहेत. येथे २१ जानेवारीपासून नवीन हळदीचे सौदे सुरू होणार आहेत. यामुळे आपली हळद लवकरात लवकर बाजारपेठेत जावी व चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकरी सरासरी १० ते १५ क्ंिवटलपर्यंत हळद उत्पादन होते. प्रतिक्ंिवटल १० हजार ते १५ हजारपर्यंत दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हळदीचे दर बाजारपेठेतील हळदीची आवक, मागील वर्षाची शिल्लक हळद आणि उपलब्ध हळदीची प्रतवारी यावर निघतात. मुळातच अजून कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला दर दिलेला नाही. यामुळे अस्वस्थ बनलेला शेतकरी आता हळदीला तरी चांगला दर मिळेल का, याच्या चिंतेत आहेत.
दहा हजार भाव मिळण्याची शक्यता
सांगलीचे हळद व्यापारी राजू मेनकर यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांत हळदीचे भाव घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांनी हळदीकडे पाठ फिरवली. राज्यात ३० टक्के हळदीचे क्षेत्र कमी झाले. कर्नाटकात मागील वर्षाची हळद शिल्लक नाही. राज्यात २५ लाख पोती शिल्लक आहेत. परंतु त्यापैकी सर्रास हळद शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे. यातील ५ टक्केच हळद व्यापाऱ्यांची आहे. उसाचे क्षेत्र वाढले आणि हळद कमी झाली. यामुळे यावर्षी हळदीचे दर स्थिर राहतील. सरासरी १० हजारांच्या पुढे दर राहतील. शिवाय चांगल्या प्रतीच्या निवडलेल्या हळदीला १४ ते १५ हजारपर्यंत भाव मिळेल. यापुढील तीन वर्षातही हळदीला उच्चांकी दर मिळेल, अशी शक्यता आहे.