शासकीय पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून दान दिल्याचे भासविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:22+5:302020-12-06T04:28:22+5:30
शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीस तात्कालीन अधिष्ठाता डाॅ. सापळे यांनी सापळे कुटुंबातर्फे रुग्णवाहिका दान दिली होती. मात्र या रुग्णवाहिका खरेदीसाठी रक्तपेढीच्या ...
शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीस तात्कालीन अधिष्ठाता डाॅ. सापळे यांनी सापळे कुटुंबातर्फे रुग्णवाहिका दान दिली होती. मात्र या रुग्णवाहिका खरेदीसाठी रक्तपेढीच्या बँक खात्यातून १३ लाख २ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे प्रितेन आसर या माहिती अधिकार कार्यकर्त्यास रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीमुळे उघडकीस आले आहे.
२०१८ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून डॉ. पल्लवी सापळे कार्यरत होत्या. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या उद्घाटनप्रसंगी रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करुन अधिष्ठातांच्या आई डॉ. सुप्रिया प्रभाकर सापळे यांच्याकडून रक्तपेढीला देणगी म्हणून रुग्णवाहिका (क्र. एमएच १० सीआर ५०३८) देण्यात आल्याचे जाहीर करुन रुग्णवाहिकेवर तसा फलक लावला. मात्र रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या बँक खात्यातूनच १३ लाख रुपये रुग्णवाहिका खरेदीसाठी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. पल्लवी सापळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन रक्तपेढीच्या पैशातून केलेली रुग्णवाहिका खरेदी करुन सापळे कुटुंबाने दान दिल्याचे भासविले असल्याचा आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला.