मृत्यूच्या दाढेतून त्याला काढले बाहेर
By Admin | Published: May 2, 2016 11:47 PM2016-05-02T23:47:12+5:302016-05-03T00:44:39+5:30
बचावकार्याचा थरार : शिगाव येथील घटना
धनंजय मडुरकर -- बागणी --आनंदाच्या जल्लोषात एक युवक नदीच्या वेगवान पाण्याच्या प्रवाहात सापडला... आणि प्रवाहाबरोबर वाहू लगला... काही वेळातच त्याचा शरीराचा खालचा भाग नदीच्या बंधाऱ्याच्या दरवाजात अडकला... आणि सुरु झाली जगण्या-मरण्याची झुंज..! कुण्या पोरांना वाटलं त्याला मगरीनं ओढलं... तर कुणाचा दुसराच अंदाज... अखेर जवळपास आठ तासांच्या थरारानंतर काळाला मोकळ्या हातानं जावं लागलं... कारण मृत्यूच्या तांडवात आपत्कालीनच्या पांडवांनी त्याला वाचवलं होतं... काळ आला होता, पण त्याची वेळ आली नव्हती, हेच या घटनेवरून स्पष्ट झाले.
१ मे रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास राजेश दत्तात्रय पाटील (वय २८) हा पात्रातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. त्याने त्यातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बंधाऱ्याजवळ असलेल्या पाणी अडविणाऱ्या लाकडी बरग्यापाशी बाहेर पडत असताना त्याचा फटीत कमरेपासूनचा खालचा भाग अडकला.
यातून सुटका करुन घेताना राजेशच्या नाका-तोंडात पाणी जाऊन तो गुदमरू लागला. अडकलेला पाय निघत नसल्याचे पाहून त्याने कडेच्या लाकडी फळीला घट्ट धरुन ठेवले. अखेर धरणाच्या भिंतीवरुन खाली दोर टाकून त्याला आधार देण्यात आला.
पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही घटना वरिष्ठांना कळवली. त्यामुळे तात्काळ सांगली येथील आयुष हेल्पलाईन टीम, कोल्हापूरची जीवन रक्षक टीम व आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी मिळून ग्रामस्थांच्या सहकार्याने राजेशला बाहेर काढले.