बंगला, फार्महाऊसवर बसून महापालिकेचे बजेट केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:25+5:302021-09-23T04:29:25+5:30
सांगली : शहराच्या विकास निधीत दुजाभाव करणारे इतिहासातील दिग्विजय सूर्यवंशी हे पहिले महापौर आहेत. सोनेरी टोळीच्या सल्ल्याने बंगला, फार्महाऊस ...
सांगली : शहराच्या विकास निधीत दुजाभाव करणारे इतिहासातील दिग्विजय सूर्यवंशी हे पहिले महापौर आहेत. सोनेरी टोळीच्या सल्ल्याने बंगला, फार्महाऊस व बाहेरील व्यक्तीच्या कार्यालयात बसून महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचा घणाघात बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. बजेटमध्ये समान निधीचे वाटप न झाल्यास महापौरांना महासभेत बसू देणार नाही. प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.
भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, माजी गटनेते युवराज बावडेकर, माजी सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक संजय यमगर यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत राष्ट्रवादीच्या कारभारावर हल्ला चढविला. ते म्हणाले की, स्थायी समितीने वस्तूनिष्ठ बजेट सादर केले होते. त्यात महापौरांनी ३७ कोटींची वाढ केली. बजेटची पुस्तिका देण्यासही पाच महिन्यांचा कालावधी लावला. त्याचा आम्ही निषेध करतो. भाजपला जनतेने सत्तेचा कौल दिला होता. पण विद्यमान महापौर हे घोडेबाजार करून पदावर बसले आहेत. आता घोडेबाजारातील पैसे काढण्याचा एकमेव उद्योग सुरू आहे. राष्ट्रवादीतील सोनेरी टोळीच कारभार पाहत आहेत. त्यांच्या बंगला, फार्महाऊसवर बसून बजेट अंतिम करण्यात आले आहे.
यापूर्वीच्या कोणत्याही महापौरांनी निधीबाबत दुजाभाव केलेला नाही. हे इतिहासातील पहिलेच महापौर आहेत. भाजपने १०० कोटींचा निधी आणला. तेव्हाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजप सदस्याप्रमाणेच निधी दिला होता. पण विद्यमान महापौरांनी केवळ मर्जीतील नगरसेवकांचीच कामे धरली आहेत. जुना बुधगाव रोड, कळंबी रोड ही कामे वगळली आहेत. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. नागरिकांसह महासभेत घुसून महापौरांना खुर्चीवर बसू देणार नाही. दंडूकशाही केल्यास न्यायालयातही शेवटपर्यंत लढा देऊ, असा इशारा दिला.
चौकट
हा तर जिल्ह्याचा अपमान
वसंतदादा पाटील, मदनभाऊ यांच्या स्मारकस्थळासाठी उपमहापौरांनी एक कोटीच्या निधीची मागणी केली होती. पण, महापौरांनी दहा लाखांची तरतूद करून केवळ उपमहापौरांचाच नव्हे, तर जिल्ह्याचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठीही ५० लाखांऐवजी २५ लाखांची तरतूद केली आहे.
चौकट
कुपवाड ड्रेनेज ठरावावर सही नाही
कुपवाड ड्रेनेज योजनेचा ठराव होऊन दोन महिने झाले, तरी त्यावर महापौरांनी सही केलेली नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा प्रकल्प तातडीने शासनाकडे पाठविण्याची सूचना केली होती. पण, त्यांच्या आदेशालाही महापौरांनी केराची टोपली दाखविली आहे. कुपवाडमधील जनतेने नेहमीच भाजपला साथ दिल्याने त्याचा राग ते काढत असल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.