बिरोबाची शपथ! शर्यतीत बैलांना शॉक देणार नाही; सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत शर्यतवानांची बैठक
By संतोष भिसे | Published: September 2, 2023 04:52 PM2023-09-02T16:52:03+5:302023-09-02T16:53:11+5:30
भंडारा उचलून घेतल्या आणाभाका, नियम मोडल्यास दोन महिने बंदी
सांगली : बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली, पण शर्यतवानांचे शेपूट वाकडेच राहिल्याचे दिसत आहे. शर्यतीमध्ये बैलांचा छळ सुरूच असल्याने शर्यतींवर पुन्हा बंदीची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शर्यत संघटनांनी आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे बैठकीत ठोस निर्णय घेतले. बिरोबाचा भंडारा उचलून नियम पाळण्याची शपथ घेतली. नियम मोडणाऱ्यांवर दोन महिने बंदीचा निर्णय घेतला.
आरेवाडीच्या बनात झालेल्या बैठकीला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून बाळासाहेब हजारे, आप्पासाहेब हजारे, रामचंद्र खोत, पश्चिम महाराष्ट्र रेसिंग असोसिएशनचे नारायण गाडगीळ, सचिन पाटील यांच्यासह शर्यत संयोजक उपस्थित होते. गेल्या काही वर्षांत शर्यतींसाठी लाखो रुपयांची बक्षिसे लावली जात असल्यानेही बैलांच्या छळात वाढ झाल्याचा सूर बैठकीत व्यक्त झाला.
बैलांना शॉक आणि दुचाकीने ढकलिंग
बैल जोराने पळावा म्हणून त्याला बॅटरीद्वारे शॉक दिला जात आहे. शेपटी पिरगाळण्याचे प्रकार सुरू आहेत. लाठीकाठीवर बंदी असतानाही वापर सुरू आहे. शर्यतीसाठी ५० हजार रुपयांची अनामत भरून सरकारी परवानगी घ्यावी लागते, ती टाळण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवर सकाळी उजाडता-उजाडता विनापरवाना चोरट्या शर्यती घेतल्या जात आहेत. या गैरप्रकारांवर बैठकीत चर्चा झाली.
बिरोबाचा भंडारा शिवून घेतली शपथ
बैठकीमध्ये आरेवाडीच्या बिरोबाचा भंडारा शिवून शपथ घेण्यात आली. शर्यतीसाठी नियम निश्चित करण्यात आले.
- गैरप्रकार करणाऱ्या चालक, मालकांना व त्यांच्या बैलांना दोन महिने शर्यतीत बंदी
- मालकाच्या अपरोक्ष बैलांचा छळ करणाऱ्या गाडीवानाला दोन महिने बंदी
- मालक, चालक, मित्र आदींनी संगनमताने गैरकृत्ये केल्यास सर्वांना आदतपासून जनरलपर्यंत सर्व शर्यतींसाठी मनाई
शर्यतींमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी नियम बनविले आहेत. त्यानुसार सध्या शर्यती व्यवस्थित सुरु आहेत. स्पर्धकांनीही शर्यतींमध्ये बैलांची काळजी घेणे अपेक्षित आहे, अन्यथा पुन्हा निर्बंध येऊ शकतात. - नारायण गाडगीळ, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र रेसिंग असोसिएशन