Sangli Crime: परजिल्ह्यातील तरुणीशी केली मैत्री, भेटीचे फोटो काढून लावला लग्नाचा तगादा; नकार देताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:30 PM2023-01-05T15:30:04+5:302023-01-05T15:30:31+5:30
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित तरुणाविरोधात खंडणी, अपहरण, मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा
इस्लामपूर : परजिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणीशी मैत्री केल्यानंतर एकत्रित जेवण आणि भेटीचे फोटो काढून लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाने पीडित तरुणीकडून नकार आल्यावर जवळपास ६ ते ७ लाख रुपयांची खंडणी उकळत तिला मारहाण आणि तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार मे ते डिसेंबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी घडला.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून शुभम भरत माने (वय २६, रा. ताकारी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध खंडणी, अपहरण, मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. माने याला शिताफीने अटक केल्यानंतर येथील न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित शुभम याने पीडित तरुणीशी असलेल्या ओळखीतून जवळीक निर्माण केली. दोघांचे एकत्रित फोटो घेतले. त्यानंतर त्याने पीडित तरुणीकडे लग्नाचा तगादा लावला. पीडितेने लग्नाला नकार देत भेटण्याचे टाळल्यावर तो आपल्याकडील फोटो कुटुंबासह समाजमाध्यमांवर पसरवून बदनामी करण्याची धमकी देत होता.
मात्र, तरीही पीडित युवतीने त्याला दाद न दिल्याने शुभम याने पीडितेकडून ऑनलाइन १ लाख ४५ हजार रुपये आणि त्यानंतर पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत ६ ते ७ लाख रुपये उकळले आहेत. मे महिन्यात पीडितेचे अपहरण करून मोटारीमध्येच तिला मारहाणही केली होती. त्यानंतर दुचाकीवरून पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
पीडित तरुणीच्या वडिलांच्या मोटारीच्या पुढील काचेवर दगड मारून नुकसान केले. त्यामुळे या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने मंगळवारी शुभम माने याच्याविरुद्ध फिर्याद दिली. निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयश्री कांबळे तपास करत आहेत.