आगामी निवडणूक लढविणारच
By admin | Published: June 15, 2017 11:47 PM2017-06-15T23:47:13+5:302017-06-15T23:47:13+5:30
आगामी निवडणूक लढविणारच
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा काहींचा समज झाला असून, अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढविणारच आहोत, अशी घोषणा माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
डॉ. कदम यांचा हा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या दिशेने होता. दरम्यान, कर्जमाफीबाबत विरोधकांशीही चर्चा करण्याचे भाजपचे धोरण लोकशाहीत नक्कीच समाधानकारक आहे, असे प्रशस्तिपत्र डॉ. कदम यांनी यावेळी देऊन टाकले.
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. कदम यांनी, ही आपली शेवटची निवडणूक आहे, यापुढे आपण निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र, सध्या वाढत चाललेली भाजपची ताकद व पलूस-कडेगाव मतदारसंघातील पारंपरिक विरोधक देशमुख बंधू यांचे वाढते प्राबल्य, यामुळे आगामी निवडणूक कदम कुटुंबीयांपैकी अन्य कोणी लढवली तर विरोधकांना लढत सोपी जाईल, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत डॉ. कदम म्हणाले की, आतापर्यंत अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. अनेक वादळे आली व गेली. सध्याची परिस्थिती पाहता आगामी निवडणूक मला लढवावीच लागेल. लोकसभा की विधानसभा, हे मात्र ज्या-त्यावेळी ठरवू.
ते म्हणाले की, शेतीकर्ज व शेतीच्या प्रश्नांवर सर्व विरोधक अधिवेशनात सरकारवर तुटून पडले. विरोधकांनी एकत्र येऊन चांदा ते बांदा संघर्ष यात्रा काढली. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले. त्यातच पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी संप जाहीर केला. त्याचा राज्यभर परिणाम झाला. शेतकरी संपावर जाणे, हे देशात पहिल्यांदाच घडले. सरसकट कर्जमाफी व हमीभाव या मुद्द्यांवर हे आंदोलन झाले. देशभर याचे लोण पसरू लागले. राज्यातही गंभीर स्वरूप येऊ लागले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची भूमिका घेतली. मात्र, त्यासंदर्भात सुकाणू समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तत्त्वत: व निकष या संकल्पनांबाबत संभ्रमावस्था आहे. तत्त्वत: व निकष या शब्दांचा नेमका अर्थ समजला पाहिजे.
कर्जमाफीसंदर्भात निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धोरण ठरविण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची समिती बनविण्यात आली. चंद्रकांतदादा पाटील सकारात्मक चर्चा करीत आहेत. सर्व विरोधकांचीही भेट घेऊन ते सर्वांची भूमिका समजावून घेत आहेत. लोकशाहीच्यादृष्टीने सरकारची ही भूमिका चांगलीच आहे, असा शेराही डॉ. कदम यांनी देऊन टाकला.
कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. केवळ कर्जमाफीने काही होणार नाही. उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव मिळणे गरजेचे आहे. शेतीसाठीच्या सिंचन योजना तातडीने पूर्ण व्हायला पाहिजेत, असे मत डॉ. कदम यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, कर्जमाफी दिल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, अशी चर्चा आहे, पण मला यात तथ्य वाटत नाही. राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता दिसत नाही. शिवसेनेशी जुळवून घेत भाजपला सत्ता टिकवावी लागेल. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजूनही भाजपप्रणीत आघाडीकडे पुरसे संख्याबळ नाही. काँग्रेसने भाजपविरोधी सर्व पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काहीही होऊ शकते.
सत्ताधाऱ्यांना नोटाबंदीचाच फायदा
सामान्य जनता आमच्यासोबत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधाऱ्यांना नोटाबंदीचा मोठा फायदा झाला. नोटाबंदीमुळे केवळ त्यांच्याकडेच पैसा मुबलक उपलब्ध झाला. त्यामुळेच त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठे यश मिळाले असल्याचा आरोपही
डॉ. कदम यांनी केला.
वारसांनी कारखाना धुळीस मिळविला
डॉ. पतंगराव कदम यांनी वसंतदादांबद्दल अनेक आठवणी सांगितल्या. दादांनी कधीही जिल्ह्याच्या प्रगतीत राजकारण आणले नाही. केवळ एका कारखान्यावर दादांनी राज्यावरच काय, देशावरही राज्य केले. त्यांच्या वारसांनी मात्र तोच कारखाना धुळीस मिळविला, असा आरोप त्यांनी केला. राजकारणात दादांचा मला कधीही विरोध नव्हता. उलट १९६७ मध्ये लोकल बोर्डाचा सदस्य करण्यात, पुण्यात भारती विद्यापीठाची इमारत उभी करण्यात दादांनीच मला मदत केली.