किलोला शंभर रुपये दिल्याशिवाय द्राक्षच विकणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:18 AM2021-02-05T07:18:52+5:302021-02-05T07:18:52+5:30
पळशी (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदारांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी माजी पं. स. सदस्य पांडुरंग जाधव, माजी ...
पळशी (ता. खानापूर) येथील द्राक्ष बागायतदारांची गुरुवारी बैठक झाली. यावेळी माजी पं. स. सदस्य पांडुरंग जाधव, माजी उपसरपंच संभाजी जाधव, माजी अध्यक्ष काकासो जाधव, अरविंद पाटील, रमेश जाधव, आदी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी द्राक्षाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. चालू वर्षी किमान शंभर रुपये दर, तोही अगोदर ठरल्याशिवाय कोणीही द्राक्ष विकणार नाही, असा ठराव करण्यात आला. आपल्या मालाच्या दर्जानुसार दर ठरवावा, किमान दर शंभर ते सव्वाशे रुपये मिळाला पाहिजे. व्यापाऱ्यांनी द्राक्षाचे नमुने घेतानाच शेतकऱ्यांशी चर्चा करून दर ठरविणे गरजेचे आहे. दर निश्चित ठरल्याशिवाय कोणीही माल देऊ नये, मिळालेल्या दराबाबत एकमेकांना माहिती देऊन संवाद राखावा, द्राक्ष दर ठरविताना खर्चाचा विचार करावा, फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
चौकट
निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांची दराबाबत उपेक्षा
पळशी येथे द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहेत. जवळजवळ सर्व द्राक्ष बागायतदार निर्यातक्षम द्राक्षशेती करतात. द्राक्षांचा दर्जा उच्च प्रतीचा असतो. मात्र, दर अपेक्षित मिळत नाही, दरवर्षी कोणाची ना कोणाची फसवणूक होते. द्राक्ष दराबाबत नेहमीच उपेक्षा राहिली आहे. अधिकारी आणि बाजार समित्यांकडून काहीच संरक्षण मिळत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनीच संघटित होण्याचा निर्णय घेतला आहे.