पक्षात आलबेल असल्याचा आभास; विरोधकही डोके वर काढणार :- नाराजांना रोखण्याची भाजपसमोर डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 07:09 PM2020-02-07T19:09:33+5:302020-02-07T19:18:51+5:30
दुसरीकडे राज्यात सत्ता आल्याने काँग्रेस आघाडीला बळ मिळाले आहे. आताच्या निवडीत आघाडीचा ‘प्लॅन’ फसला असला तरी, भविष्यात आघाडीशी दोनहात करावे लागणार आहेत.
शीतल पाटील -
सांगली : महापालिकेतील सत्तेला दीड वर्ष पूर्ण होत असतानाच, सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी उफाळून आली आहे. महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापालिकेचा गाडा हाकताना पारदर्शी कारभारासोबतच आता या नाराजांना रोखण्याचे आव्हान भाजपसमोर असेल. दुसरीकडे राज्यात सत्ता आल्याने काँग्रेस आघाडीला बळ मिळाले आहे. आताच्या निवडीत आघाडीचा ‘प्लॅन’ फसला असला तरी, भविष्यात आघाडीशी दोनहात करावे लागणार आहेत.
आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवित पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन केली. या कालावधित सर्वत्र भाजपची सत्ता होती. पण दीड वर्षात महापालिकेतील सत्तेला ग्रहण लागले आहे. महापौर, उपमहापौरांचे राजीनामानाट्य, त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवेळी निर्माण झालेली नाराजी, महापालिकेचे नेते शेखर इनामदार यांना डावलणे, नगरसेवकांच्या वाढलेल्या अपेक्षा यांसह विविध कारणांनी नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवारी महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपमध्ये सारे काही आलबेल असल्याचे दाखविण्यात नेत्यांना यश आले असले तरी, निवडीनंतर अनेक नगरसेवकांनी महापालिका मुख्यालय तातडीने सोडले. यावरूनच अजूनही नाराजी कायम असल्याचे स्पष्ट होते.
महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी भाजपने कोअर कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे शहरातील दोन्ही आमदारांनी महापालिकेपासून दूर राहणेच पसंत केले होते. पण जनतेने आमदारांच्या कामाकडे पाहून भाजपला सत्ता दिली, याचा विसर साऱ्यांनाच पडला आहे. परिणामी कोअर कमिटीतही संघर्ष उफाळून आला आहे. महापालिकेतील बरे-वाईट कारभाराचे खापर शेवटी दोन्ही आमदारांवरच फुटणार आहे. त्यात गेल्या दीड वर्षात अनेक वादग्रस्त विषयांच्या जाळ्यात भाजप अडकली आहे. नगरसेवकांत दुफळी आहे. पारदर्शी कारभाराचा आभास निर्माण झाला आहे. यात पक्षात नाराजी उफाळून आली, तर वर्षभरानंतर होणा-या महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल.
दीड वर्षात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला कोंडीत पकडण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या आहेत. पण आताच्या निवडीवेळी सत्ता पालटण्यासाठी आघाडीने कंबर कसली होती. दहा ते बाराजण संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. विरोधकांचा बार फुसका ठरला असला तरी, भविष्यात विरोधक पुन्हा डोके वर काढू शकतात. त्यात नाराजांचा अधिक भर पडल्यास, ते भाजपच्या सत्तेसाठी घातक ठरू शकते.
नाराजी कायम
विधानसभा निवडणुकीपासून महापालिकेतील भाजपअंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्याला महापौर, उपमहापौर निवडीने आणखी हवा मिळाली. भाजपच्या कोअर कमिटीत फाटाफूट झाली आहे. शुक्रवारी महापौर, उपमहापौर निवडीनंतर काही नगरसेवकांनी तातडीने महापालिका मुख्यालय सोडले. महापालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती असलेले शेखर इनामदारही सत्कारावेळी गायब होते. महापौर, उपमहापौरांना नेत्यांच्या उपस्थितीत खुर्चीत बसविण्यात आले. पण त्यालाही इनामदार यांच्यासह त्यांचे निष्ठावंत नगरसेवक गैरहजर होते. यावरून भाजपला भविष्यात महापालिकेत तारेवरची कसरत करावी लागणार, हे स्पष्ट आहे.