कडेगावला लस नोंदणीची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:27 AM2021-05-11T04:27:32+5:302021-05-11T04:27:32+5:30
कडेगाव : तालुक्यातील कडेगाव आणि चिंचणी या दोन्ही ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४५ ...
कडेगाव : तालुक्यातील कडेगाव आणि चिंचणी या दोन्ही ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४५ वयोगटांतील व्यक्तींना कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. ऑनलाईन
नोंदणीसाठी अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे ज्येष्ठांची डोकेदुखी होत
आहे. मात्र, वेळेत नोंदणी व केंद्र निश्चिती करणारी तरुणाईच लसीकरण केंद्रावर दिसत आहे.
कडेगाव तालुक्यात आज १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील लसीकरण सुरू झाल्यानंतर कोविन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करूनच लस दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करताना अनेक अडथळे निर्माण होत आहेत. एखाद्या केंद्रावर लसीचा कोटा उपलब्ध असला तरी संबंधितांना ऑनलाईन ओटीपी लवकर प्राप्त होत नाही. ओटीपी प्राप्त होईपर्यंत केंद्रावरील लसीचा कोटा संपुष्टात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता तालुक्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, तसेच प्रत्येकाला सुरळीत लस मिळावी, यासाठी नोंदणीतील अडथळेदेखील दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. केंद्राचा कोटा उपलब्ध झाल्यानंतर तो अवघ्या पाच मिनिटांतच संपत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
चौकट :
बाहेरील लोकांचा ओघ
ग्रामीण रुग्णालय कडेगाव आणि चिंचणी या दोनच ठिकाणी लसीकरण केंद्र आहे. कित्येक स्थानिकांना वेळेत लसीची नोंदणी होत नाही. त्या वेळेत जवळपासच्या अन्य तालुक्यातील व सद्या गावी आलेल्या शहरी लोकांकडून येथील केंद्रावर लस घेण्याचा पर्याय निवडला जात आहे.
त्यामुळे तालुक्यातील स्थानिक नागरिकांच्या नोंदीच होत नाहीत.