स्थायीसाठी इच्छुकांच्या गर्दीने नेत्यांना डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:30 AM2021-08-20T04:30:53+5:302021-08-20T04:30:53+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील नऊ सदस्यांसह स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेचा फैसला शुक्रवारच्या महासभेत होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांत ...
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील नऊ सदस्यांसह स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेचा फैसला शुक्रवारच्या महासभेत होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांत इच्छुकांची गर्दी झाल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादीची नेतेमंडळी मुंबईत ठाण मांडून आहेत. तर भाजप व काँग्रेसच्या सदस्यांबाबत शेवटच्या क्षणी नावे जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत उत्सुकता लागली आहे.
स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले आहेत, तर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. शुक्रवारी महासभेत पक्षाच्या गटनेत्यांकडून या जागांसाठी सदस्यांची नावे दिली जाणार आहेत. भाजपच्या वाट्याला चार जागा आहेत. त्यासाठी १६ जण इच्छुक आहेत. ज्येष्ठ नगरसेवक स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, निरंजन आवटी, सोनाली सागरे, प्रकाश ढंग, ऊर्मिला बेलवलकर, गीतांजली ढोपे-पाटील अशी मोठी यादी आहे. त्यात माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांचेही नाव चर्चेत आले आहे. गटनेते विनायक सिंहासने यांनी इच्छुकांची यादी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे सुपुर्द केली आहे. गाडगीळ हे भाजपच्या इतर नेत्यांशी चर्चा करून नावे निश्चित करणार आहेत. निष्ठावंत नगरसेवकांनाच स्थायीत संधी देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
काँग्रेसच्या दोन जागांसाठी फिरोज पठाण, वर्षा निंबाळकर, रोहिणी पाटील, संतोष पाटील, वहिदा नायकवडी, आरती वळिवडे, शुभांगी साळुंखे हे सदस्य इच्छुक आहेत. जयश्रीताई पाटील, विशाल पाटील हे अंतिम निर्णय घेणार आहेत, तर राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या मोठी आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, गटनेते मैनुद्दीन बागवान हे मुंबईत ठाण मांडून आहेत. रात्री पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून सकाळी नावे निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
सय्यद, नायकवडी, केरीपाळे, हारगे यापैकी कोण?
स्थायी सदस्यपदासाठी राष्ट्रवादीतून नर्गिस सय्यद, अतहर नायकवडी, संगीता हारगे, केरीपाळे यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. यापैकी तिघांना संधी दिली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील घेणार आहेत.
चौकट
स्वीकृतला वर्षाचीच संधी
स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादीतून जमील बागवान व हरिदास पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईत पालकमंत्री पाटील यांच्यासोबत संजय बजाज, मैनुद्दीन बागवान यांनी चर्चा केली. दरम्यान, दोघांपैकी कुणालाही संधी मिळाली तरी ती एक वर्षासाठीच असेल. वर्षभरानंतर राजीनामा घेऊन दुसऱ्याला संधी दिली जाणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष बजाज यांनी सांगितले.