इस्लामपुरात १२०० कामगारांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:28+5:302021-03-20T04:25:28+5:30
इस्लामपूर येथे असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी करताना हिंद लॅबचे डॉक्टर. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित ...
इस्लामपूर येथे असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी करताना हिंद लॅबचे डॉक्टर.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार संघटनेच्या वतीने इस्लामपूूर व आष्टा शहरासह वाळवा तालुक्यातील १२०० असंघटित नोंदणीकृत कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हिंद लॅबचे डॉक्टर व कर्मचारी यांनी ही तपासणी केली.
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळाकडे वाळवा तालुक्यातील चार हजार असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे. यातील कामगारांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. इस्लामपूर शहरात हनुमाननगर, सावकार कॉलनी, साठेनगर तसेच नेर्ले, रेठरेधरण, गोटखिंडी, कि.म.गड आदी गावांमध्ये ही आरोग्य तपासणी करण्यात आली.
हिंद लॅबचे डॉ. साहिल पठाण, डॉ. भास्कर कुलकर्णी, डॉ. राजन शिंदे व त्यांच्या १० सहकाऱ्यांनी या तपासण्या केल्या आहेत. उर्वरित कामगारांची तपासणी कोरोनाची परिस्थिती बघून केली जाणार आहे. माजी नगराध्यक्ष व संघटनेचे सल्लागार सुभाषराव सूर्यवंशी, निवास गायकवाड, सागर चव्हाण, राजकुमार पाटसुते, विक्रम धुमाळ, सचिन बोरचाटे, निवास जाधव, रंगराव देशमुख यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.