इस्लामपुरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:36+5:302021-07-22T04:17:36+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाचा वाढता आलेख, पावसाची सुरुवात, तुंबलेली गटारे, रस्त्यावरील खड्डे, त्यात साचलेले पाणी ...
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाचा वाढता आलेख, पावसाची सुरुवात, तुंबलेली गटारे, रस्त्यावरील खड्डे, त्यात साचलेले पाणी अशा परिस्थितीने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
इस्लामपूर आणि परिसरात कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु, याला नागरिक सहकार्य करत नाहीत. अत्यावश्यक सुविधा सुरू आहेत. त्यामुळे आरोग्याच्या नावाखाली बाजारपेठा गर्दीने फुलत आहेत. विवाहासाठी ५० पाहुण्यांची उपस्थिती दोनशेच्या घरात जात आहे. अंत्यसंस्कारवेळी वीस पै पाहुणे उपस्थितीचा नियम धाब्यावर बसवला जात आहे. हॉटेल पार्सल नियम पाळले जात नाहीत. यामुळेच कोरोना महामारीचे संकट गडद होत आहे.
नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा सहजपणे उपलब्ध होत आहेत. यावर पालिका प्रशासन जुजबी कारवाई करत दिखाऊपणा करत आहे. पोलीस प्रशासन कडक पावले उचलत नाही. नाकाबंदीच्या घोषणा कागदावरच राहिल्या. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे उभे राहिले आहे. त्यातच भुयारी गटारांचे काम अर्ध्यावर असल्याने रस्त्याची कामे झाली नाहीत. पाऊस सुरु त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे तापासारखे साथीचे रोग पसरले आहेत. यातूनच डेंग्यू, कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. या साथीच्या रोगांमुळे इस्लामपूर आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध आहेत. इस्लामपूर, आष्टा पालिका क्षेत्रांसह ४४ गावांमध्ये कडक निर्बंध असतानाही सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत नाही. याबाबत स्वतः पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घालून प्रशासकीय यंत्रणा सक्षम करावी, जेणेकरून कोरोना महामारी रोखता येईल.