आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:29 PM2022-11-22T13:29:23+5:302022-11-22T13:29:57+5:30
जिल्हा व तालुकास्तरावरून वरिष्ठ भेटी देऊ लागले, तेव्हा तेथील गैरसोयी प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागल्या. त्यावर जागेवरच निर्णय होऊ लागले आहेत.
संतोष भिसे
सांगली : आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले. रुग्णांना २४ तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी असा हेतू आदेशांमागे होता. प्रत्यक्षात या भेटींमुळे आरोग्य केंद्रांचीच तब्येत सुधारायला लागली आहे. रुग्णालयांतील अनेक गैरसोयी दूर होऊ लागल्या आहेत.
सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना तेथील कर्मचाऱ्यांना करावा लागतो. जिल्ह्यातील बहुतांशी केंद्रांच्या इमारती चांगल्या असल्या, तरी अनेक गैरसोयीपण आहेत. त्या दूर व्हाव्यात म्हणून रुग्णालयाकडून पत्रव्यवहार व पाठपुरावा होतो; पण कार्यवाही सरकारी स्टाईलने होते. मुंडे यांच्या आदेशानंतर जिल्हा व तालुकास्तरावरून वरिष्ठ भेटी देऊ लागले, तेव्हा तेथील गैरसोयी प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागल्या. त्यावर जागेवरच निर्णय होऊ लागले आहेत.
बावची (ता. वाळवा) आरोग्य केंद्रात निवासस्थानाला वीजपुरवठा होता; पण महावितरणकडे पैसे न भरल्याने रुग्णालयाची इमारत मात्र अंधारात होती. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने यांनी अचानक भेट दिली, तेव्हा ही समस्या लक्षात आली. मुख्यालयात परतताच, त्यांनी ३४ हजार रुपयांची तरतूद करून वीजपुरवठा सुरू केला.
हिंगणगाव केंद्रातील एक दरवाजाच लागत नव्हता. किरकोळ काम असूनही केले जात नव्हते. डॉ. माने यांनी नोटीस काढताच दोन दिवसांत दरवाजाची दुरुस्ती झाली. वरिष्ठ अधिकारी येऊ लागल्याने स्वच्छता, रुग्णांच्या नियमित नोंदी, स्वच्छतागृहांची साफसफाई आदींकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारू लागली आहे.
दार नको, बेल वाजवा
जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री आरोग्य केंद्रांत भेटी दिल्या, तेव्हा डॉक्टरांना उठविण्यासाठी दरवाजा ठो-ठो वाजवावा लागला. रुग्णालाही दार वाजवावे लागू शकते हे यानिमित्ताने लक्षात आले. त्यामुळे आता सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत डोअरबेल बसविण्याच्या सूचना आरोग्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ‘रात्री डॉक्टरांना उठविण्यासाठी बेल वाजवावी’ असा फलकही लावण्यास सांगितले आहे.
जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांना दिलेल्या अचानक भेटीवेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जागेवर आढळले. यानिमित्ताने तेथील गैरसोयीदेखील लक्षात आल्या. आवाक्यात असलेल्या गैरसोयी दूर करण्याची कार्यवाही तात्काळ केली. - डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्याधिकारी