तासगाव पालिकेकडून ९५ कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:45 AM2021-05-05T04:45:17+5:302021-05-05T04:45:17+5:30
तासगाव : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनो योद्धा म्हणून काम करणाऱ्या पालिकेच्या ९५ कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्यावतीने आरोग्य विमा देण्यात आला ...
तासगाव : स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनो योद्धा म्हणून काम करणाऱ्या पालिकेच्या ९५ कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्यावतीने आरोग्य विमा देण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला एक हजार ५०० रुपये याप्रमाणे एक लाख ४२ हजार ५०० रुपये पालिका फंडातून खर्च करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून तासगाव तालुक्यावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. आतापर्यंत तालुक्यातील पाच हजार ७६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील यातील चार हजार ३३६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ९८२ रुग्ण 'होम आयसोलेशन'मध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत २१२ रुग्णांना कोरोनाच्या चक्रव्यूहात आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाच्या या जीवघेण्या संकटाशी सामना करण्यासाठी तासगावात अनेक हॉस्पिटल सुरू करण्यात आली आहेत. तासगाव पालिका व खासदार संजय पाटील यांच्या माध्यमातूनही महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात हॉस्पिटल सुरू झाले आहे.
पालिकेच्या पुढाकारातून सुरू झालेल्या हॉस्पिटलमध्ये पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस वेगवेगळ्या प्रकारची सेवा बजावत आहेत. आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कामगार तर आपला जीव गहाण ठेवून गेल्या वर्षभरापासून आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग अधिक आहे. याचदरम्यान काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.
त्यामुळे पालिकेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा उतरावा, असा ठराव पालिकेत करण्यात आला होता. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांना विमा सुरक्षा देण्यात आली.