वांगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मितीस आरोग्यमंत्र्यांची मान्यता : विश्वजित कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:20+5:302021-04-22T04:28:20+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी पदनिर्मिती प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याचे आदेश आराेग्यमंत्री राजेश ...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी पदनिर्मिती प्रस्तावाला तात्काळ मान्यता देण्याचे आदेश आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी दिले आहेत, अशी माहिती कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
डॉ. कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी वांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी दिली होती. आज त्याठिकाणी सुसज्ज व सर्व सोयींयुक्त अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आहेे; परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांचा तुटवडा भासत असल्याने त्याठिकाणचा पदनिर्मिती प्रस्ताव प्रलंबित होता. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ वांगीसह शेळकबाव, शिवणी, हिंगणगाव खुर्द, अंबक, शिरगाव, रामापूर, तडसर यासह परिसरातील अन्य गावांना व उपकेंद्रांना होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आरोग्य केंद्राची गरज व अन्य बाबी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याठिकाणी पदनिर्मिती प्रस्तावास मान्यता देण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे वांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.