सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:50 PM2024-05-17T15:50:18+5:302024-05-17T15:50:56+5:30

अकोला प्रथम, नागपूर द्वितीय, नागरिकांना दिलेल्या आरोग्य सुविधांनुसार गुणांकन

Health officials of Sangli ranked third in the state | सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

सांगलीचे आरोग्य अधिकारी राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

सांगली : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) स्पर्धेत जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. मार्चमधील क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सांगलीचे आरोग्य अधिकारी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

यापूर्वी विसाव्या क्रमांकावर असणाऱ्या सांगलीने आता थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. प्राथमिक आरोग्य केेंद्रांद्वारे नागरिकांना दिलेली दर्जेदार आरोग्यसेवा आणि सुविधांमुळे ही आघाडी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट करण्याची मोहीम सुरू आहे. भौतिक सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे केंद्रांचा कायापालट होत आहे. अनेक सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी जिल्हा सातत्याने या क्रमवारीत आघाडीवर होता. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये ३८.१३ गुण मिळाले. गुणांक १.७४ ने कमी झाला. त्यामुळे क्रमवारीत घसरण झाली होती.

प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी यंत्रणेत सुधारणा केल्या. त्यानंतर जिल्ह्याने पुन्हा आघाडी घेतली. पहिला क्रमांक अकोला व दुसरा क्रमांक नागपूर जिल्ह्याने पटकावला. तिसरा क्रमांक सांगलीला मिळाला.

स्पर्धेत अशी होते तपासणी

प्रत्येक महिन्यात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेण्यात येते. मलेरिया, डेंग्यू, कुटुंबकल्याण अशा विविध आजार आणि योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, याचा सविस्तर आढावा घेतला जातो. प्रशासकीय कामकाजाची माहिती घेण्यात येते. त्यानंतर इतर जिल्ह्यांशी तुलना करून क्रमवारी घोषित केली जाते.

आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याने यश मिळाले. भविष्यात जिल्हा प्रथम क्रमांक पटकावेल, यादृष्टीने नियोजन सुरू आहे. लोकसहभागातून अजून प्रभावीपणे सेवा देण्यावर आमचा भर आहे. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Health officials of Sangli ranked third in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.