Coronavirus Sangli updates -संपूर्ण महिना सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरू ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 02:52 PM2021-04-02T14:52:49+5:302021-04-02T14:59:56+5:30
Coronavirus Sangli updates - एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण महिना सुट्टीच्या दिवशीही (30 दिवस) कोरोना लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा मिशन मोडवर यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
सांगली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खाजगी हॉस्पीटलसाठी पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वीत करण्यात आली आहेत. तसेच एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण महिना सुट्टीच्या दिवशीही (30 दिवस) कोरोना लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा मिशन मोडवर यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, सर्व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खाजगी रूग्णालये अधिग्रहीत केली आहेत. त्या रूग्णालयांनी त्यांच्या आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील जबाबदारी विहीत वेळेत पार पाडावी. जिल्ह्यामध्ये रूग्णांची संख्या वाढल्यास बेड्सची संख्या कमी पडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बेड्स इन्फॉर्मेशन सिस्टीम नियमितपणे अद्ययावत करावी, अशा सूचना चौधरी यांनी दिल्या.
रूग्णालयाच्या दर्शनी भागात रूग्णालयात एकूण उपलब्ध असणाऱ्या बेड्सची संख्या, उपचारार्थ असलेल्या रूग्णांची संख्या व रिक्त असलेल्या बेड्सची संख्या या बाबतची माहिती लावण्यात यावी. खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णाला ॲडमिट करून घेण्याची आवश्यकता असल्यासच ॲडमिट करून घ्यावे, असे केल्याने ज्यांना खरोखरच ॲडमिट करण्याची आवश्यकता आहे त्यांना बेड्स उपलब्ध होतील. खाजगी रूग्णालयांनी बिलींगबाबत प्रशासनाने नेमून दिलेल्या ऑडिटरकडूनच बिलांची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना दिल्या.
खाजगी रूग्णालयांसाठी नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकारी यांना खाजगी रूग्णालयांनी सहकार्य करावे. त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचना, उपाययोजना यांची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच खाजगी रूग्णालये प्रशासनाने दिलेल्या सूचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करतात किंवा कसे याबाबतची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अहवाल द्यावेत. सद्यस्थितीत खाजगी रूग्णालयांनी रूग्णांच्या कोरोना चाचण्या शासकीय यंत्रणांच्या मार्फत करून घ्याव्यात, अशा चौधरी यांनी सूचना दिल्या.
आरोग्य विभागाच्या यंत्रणांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालयांनी कोरोना उपचारासाठीची यंत्रणा अद्ययावत करावी. यासाठी निधीची आवश्यकता भासल्यास तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना चौधरी यांनी दिल्या.
एखाद्या ठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास लसीकरणावर याचा परिणाम होवू नये यासाठी लसीकरण केंद्रांना पर्यायी जागा उपलब्ध होईल याबाबतचे नियोजन व सर्व्हेक्षण ग्रामीण व शहरी भागात संबंधित यंत्रणांनी करून घ्यावे. सद्यस्थितीमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले असून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी मंडप, पाणी याची तातडीने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सोय करावी, अशा सूचना चौधरी यांनी दिल्या.
कोविड हॉस्पीटलच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभे करण्यात आले आहेत. ऑक्सिजन प्लँटची पाहणी करून आवश्यक असल्यास तातडीने दुरूस्ती करून घ्यावी. ऑक्सिजन पुरवठा आवश्यकतेनुसार व सोयीनुसार उपलब्ध करून घ्यावा. विद्युत पुरवठा खंडीत होवू नये याबाबतचे योग्य नियोजन करावे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार एकाच ठिकाणी शहरी भागात 5 व गा्रमीण भागात 10 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळल्यास त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया राबविण्यात याव्यात. तसेच पोलीस विभागास तातडीने सूचित करण्यात यावे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची यंत्रणा सज्ज ठेवावी. कोरोना रूग्णांना आवश्यकतेनुसार होम आयसोलेशन करण्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. होम आयसोलेशन करण्यात आलेल्या रूग्णांच्या घराबाहेर दर्शनी फलक तातडीने लावण्यात यावेत, असे आदेशित करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आरटीपीसीआर टेस्ट, रॅपिड ॲन्टीजन टेस्ट वाढवाव्यात अशा चौधरी यांनी सूचना दिल्या.
आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेताना बहुतांशी ठिकाणी डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, वर्ग 4 चे कर्मचारी, वाहन चालक यांची मागणी होत आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या माध्यमातून येणारा कर्मचारी वर्ग मागणीनुसार पुरविण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावाचा अनुभव आरोग्य विभागाच्या पाठीशी असून मागील वर्षामध्ये ज्या यंत्रणा उभ्या करण्यात आल्या होत्या, जे आदेश निर्गमित करण्यात आले होते तेच आदेश आता लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी आलेल्या अनुभवांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, कोरोना परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समन्वयाचा अभाव झाल्यास यंत्रणेवर अधिकचा ताण येईल. कोरोना रूग्णांना देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी. कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांचा उपचाराबाबत गैरसमज वाढू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे जनतेमध्ये अफवा पसरणार नाहीत.
ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना भेटी देवून तिथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा यांचा अहवाल प्रशासनास सादर करावा, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, कोरोना लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.