महापालिकेचे रुग्णालय नव्हे आरोग्य मंदिर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:37+5:302021-05-27T04:27:37+5:30
फोटो : २६ शीतल ०१, २६ शीतल ०२ लोकमत न्यूज नेटवर्क शीतल पाटील सांगली : मिरज शहरातील प्रभाग २० ...
फोटो : २६ शीतल ०१, २६ शीतल ०२
लोकमत न्यूज नेटवर्क
शीतल पाटील
सांगली : मिरज शहरातील प्रभाग २० मधील महापालिकेचे आरोग्य केंद्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. महापालिका रुग्णालय म्हटले की अस्वच्छता, सुविधांचा अभाव असा अनुभव अनेकांना येतो; पण या केंद्राने सुखद धक्का दिला आहे. हिरवळ, पेव्हर ब्लाॅक, आकर्षक विद्युत रोषणाई, रुग्णांना बसण्यास बाकडे, त्यावर छत अशा सुविधांनी आरोग्य केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी अनेक सुविधा स्वखर्चाने उभारल्या आहेत, हेही विशेष!
महापालिकेच्या आरोग्य केंद्राबद्दल नागरिकांच्या मनात नेहमीच नकारात्मक भावना राहिली आहे; पण हे केंद्र गोरगरिबांसाठी जीवनदायी ठरले आहे. कधीकाळी महापालिकेच्या रुग्णालयाकडे न फिरकणारे नागरिक आता कोरोनाच्या काळात चाचणी, लसीकरणासाठी केंद्रावर जात आहेत. त्यात नव्याने बांधलेली दहा आरोग्य केंद्रे सोयीसुविधायुक्त आहेत. त्यातील मिरजेच्या प्रभाग २० मधील आरोग्य केंद्राची मोठी चर्चा आहे. कोल्हापूर, कर्नाटकातील नागरिकही या आरोग्य केंद्रातील सोयसुविधांबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. खुद्द आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी या केंद्राला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मिरजेतील जुना हरिपूर रस्त्यावरील श्रावणी पार्क परिसरात गुडघाभर चिखलातून जावे लागत होते; पण आरोग्य केंद्राचे बांधकाम सुरू झाले आणि या परिसरातील रस्तेही डांबरी झाले. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी या आरोग्य केंद्राच्या बांधकामाला सुरुवात झाली. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. वर्षभरातच बांधकाम पूर्ण होऊन आरोग्य केंद्र खुले झाले. कोरोनाच्या काळात याचा मोठा फायदा झाला. दर बुधवारी येथे मोफत डोळ्यांची तपासणी, चष्म्यांचे वाटप होते. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हृदयविकारासंदर्भात प्राथमिक तपासणी केली जाते. केंद्रात अत्याधुनिक ईसीजी यंत्र आहे. थायराॅइड, रक्ताच्या चाचण्याही मोफतच होतात.
मुख्य इमारतीसमोर लाॅन तयार करण्यात आले आहे. बाजूला पेव्हर ब्लाॅक बसविलेले आहेत. रुग्ण, नातेवाइकांच्या सावलीसाठी तीन शेड उभारले आहेत. शेडमधील हवा खेळती ठेवण्यासाठी अल्ट्रा एअर फिल्टर बसविले आहेत. आरोग्य केंद्रात चहा, काॅफीचे यंत्र आहे. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून चाचणी व लसीकरण सुरू आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून लोक लसीकरणासाठी या केंद्राला प्रथम पसंती देत आहेत.
चौकट
स्वखर्चाने सायकल वाटप
आरोग्य केंद्रात आशा सेविका, परिचारिका, डाॅक्टर असा २० ते २५ जणांचा स्टाफ आहे. २० आशा सेविकांना थोरात यांनी स्वखर्चातून सायकली दिल्या आहेत. येथील संगणकचालकाची सायकल नादुरुस्त झाल्याने त्याला केंद्रावर येण्यास उशीर होत होता. थोरात यांनी त्याला नवीन सायकल घेऊन दिली. परिसरात त्यांनी स्वखर्चातून एलईडी दिवे बसविले आहेत.