Sangli: कुंडल वन अकॅडमीतील प्रशिक्षणार्थींचे आरोग्य रामभरोसे, डॉक्टरच उपलब्ध नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 18:46 IST2025-03-03T18:46:19+5:302025-03-03T18:46:51+5:30
बॅचचे फिटनेस सर्टिफिकेट घेतले जाते बहिस्थ डॉक्टरांकडून

संग्रहित छाया
आशुतोष कस्तुरे
कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील वन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थींचे आरोग्यच आता धाेक्यात आले आहे. तेथे पूर्णवेळ आरोग्य अधिकारी असणे गरजेचे असताना अर्धवेळ म्हणजे फक्त तीन तास अधिकारी उपस्थित असतो. भरीत भर म्हणून हे अर्धवेळ डॉक्टरही तिथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अकॅडमीत येणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी येथे चिखलदरा वन प्रशिक्षण केंद्रातील ११० फॉरेस्ट गार्डची बॅच भेट देण्यासाठी आली होती. त्यातील जवळपास ६३ प्रशिक्षणार्थींना बाहेरील पॅकेटमधील अन्न खाल्ल्याने त्रास झाला होता. यातील काही गंभीर स्थितीत होते. त्यांना सांगलीला उपचारासाठी नेण्यात आले. पण, ज्यांना कमी जास्त प्रमाणात त्रास होता. त्यांनाही पलूस व कुंडल येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. या दरम्यान कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. जर तशी परिस्थिती आली असती तर याला जबाबदार कोण? जर उशिरा उपचार झाल्यामुळे एखाद्या गार्डच्या आयुष्यावर बेतले असते तर? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
कोणतीही बॅच येथे दाखल होताना फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते. तेही सध्या बहिस्थ डॉक्टरांकडून घेतले जाते. राज्यातील विविध विभागातील सहा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींनाही येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना सुसज्ज निवास व्यवस्था, उत्कृष्ट भोजन, व्यायामशाळा, विविध खेळ प्रकारांचीही सुविधा पुरविली आहे. पण, फक्त वैद्यकीय अधिकाऱ्याचेच का वावडे आहे ? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.
२०१४ साली सुरुवात
या कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीची सुरुवात १७ फेब्रुवारी २०१४ साली झाली. दिवंगत वन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या संकल्पनेतून या प्रशिक्षण केंद्राची येथे स्थापना करण्यात आली होती. येथे प्रशिक्षणाच्या दृष्टीने कसलीही कमतरता भासू नये, याची दक्षता घेतली आहे.
प्रत्येकी तीन लाख
वानिकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रगल्भता येण्यासाठी संबंधित राज्य त्या प्रशिक्षणार्थीच्या खर्चापोटी अठरा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी तीन लाख दिले जायचे. ते आता पाच लाख झाले आहे.
वानिकी हे देश पातळीवरील प्रशिक्षण केंद्र असूनही येथील प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी पूर्णवेळ डॉक्टर नसणे ही बाब गंभीर आहे. यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा करू - आमदार अरुण लाड.
कुंडल वन अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी उच्च दर्जाचे असल्याने त्यांच्यावर अकॅडमीमध्येच किमान प्राथमिक उपचार होण्यासाठी पूर्णवेळ डॉक्टर मिळावा. आणि जो अर्धवेळ सध्या कामावर नाहीत, याची माहिती मागवून लवकरच कारणे शोधू. - संग्राम थोरबोले, सामाजिक कार्यकर्ता.
वन अकॅडमीत घडलेले प्रशिक्षणार्थी
वर्ष | राज्य | प्रशिक्षणार्थी |
२०१५ | महाराष्ट्र | २९ |
२०१६/१७ | गुजरात | ३९ |
२०१८ | महाराष्ट्र | ७१ |
२०१९ | महाराष्ट्र, आसाम, वेस्ट बंगाल | ३२ |
२०१९ | महाराष्ट्र, उत्तराखंड | ३२ |
२०२० | मणिपूर, मध्य प्रदेश | ४१ |
२०२१ | मणिपूर, मध्यप्रदेश, मिझोराम, कर्नाटक, छत्तीसगढ | ३७ |
२०२२ | आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक, छत्तीसगढ, तामिळनाडू | ५२ |
२०२३ | मध्यप्रदेश | ३६ |