Sangli: रासायनिक वायूमुळे समडोळी, कवठेपिरानमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका
By अशोक डोंबाळे | Published: December 20, 2023 04:41 PM2023-12-20T16:41:06+5:302023-12-20T16:41:39+5:30
उग्र वासाने नागरिक हैराण, प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष
समडोळी : लक्ष्मी फाट्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मिरज तालुक्यातील समडोळी, कवठेपिरान रस्त्यालगतच्या एका खासगी कारखान्यातून हवेत पसरत असलेल्या रासायनिक वायूमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खासगी कारखान्याच्या प्रदुषणाकडे प्रदुषण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याप्रश्नी संबंधित कारखानदारांवर कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे समडोळी व परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. याच कारखान्यातून यापूर्वी चरखुदाईद्वारे रासायनिक प्रक्रियायुक्त पाणी शेती क्षेत्रात सोडण्यात येत होते. सध्या कारखान्यातून गॅससदृश्य वायू परिसरात पसरत चालल्याने या भागातील शेतकरी वाहनधारकांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
समडोळी रस्त्यावरील मनपाच्या कचरा डेपोतील ढिगांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आग लावण्याचे प्रकार घडतात. हा प्रश्न डोकेदुखीचा ठरू पाहत आहे. तशातच या परिसरातील एका कारखान्यातून गॅससदृश्य पसरत चाललेला वायूमुळे नजीकच्या काळात हवा प्रदूषणाचा प्रश्न जटिल बनण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने या प्रश्नावर तातडीने कारवाईची पावले उचलण्याची मागणी होत आहे.
उग्र वासाने नागरिक हैराण
लक्ष्मी फाट्यानजीकच्या एका कारखान्यातून गॅससदृश वायू बाहेर सोडला जातो. त्याच्या उग्र वासाने शेतकरी, वाहनधारक हैराण झाले आहेत. कचरा डेपोवरील धुराच्या समस्येला आता कुठे पूर्णविराम मिळाला आहे; परंतु गॅससदृश वायूच्या वासाने श्वसनाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.