आराेग्य कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे : दत्तात्रय पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:28 AM2021-03-17T04:28:11+5:302021-03-17T04:28:11+5:30
जत : सांगली जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी लढा उभा केला तरच सरकार आपल्याला मागण्या मान्य करील, भविष्यात ...
जत : सांगली जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी लढा उभा केला तरच सरकार आपल्याला मागण्या मान्य करील, भविष्यात संघटना तयार करून चळवळ उभी करण्यासाठी एकत्र या, असे आवाहन सांगली जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले.
जत पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शांताराम कुंभार, सुरेश कांबळे, गौस खतीब, के. एल. बारापात्रे, दिलीप शिंदे उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काची लढाई भविष्यात निकराची होण्याची चिन्हे आहेत. येणारी व्यवस्था आपले हक्क आपल्याला देईल याची खात्री नाही. सरकार नवीन कर्मचारी भरती करीत नाही. अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्याची पातळी ओलांडत आहे. असे सांगून दत्तात्रय पाटील म्हणाले की, सरकार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कर्मचाऱ्यांचे लचके तोडत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्रित येऊन संघटना बळकट करूया.
यावेळी मीना कोळी, डी. टी. शिंदे, प्रमिला साबळे, आशा शिंदे, इंदुमती चव्हाण, एस. आर. कदम यांच्यासह संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.