अवैध पाच अर्जाच्या अपिलांवर शुक्रवारी सुनावणी
By admin | Published: May 3, 2016 11:10 PM2016-05-03T23:10:44+5:302016-05-04T00:57:40+5:30
वसंतदादा कारखाना निवडणूक : साखर सहसंचालकांकडून नोटीस प्रसिद्ध
सांगली : वसंतदादा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत बाद झालेल्या पाच उमेदवारांनी साखर सहसंचालकांकडे केलेले अपील आता सुनावणीला घेण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.
कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस दिला नसल्याच्या कारणावरून ९० उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले होते. उत्पादक गटातच हा नियम लागू झाल्याने निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. त्यातच छाननी प्रक्रियेविरोधात नाराज झालेल्या काही उमेदवारांनी यासंदर्भात कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयात अपील दाखल केले. एकूण पाचजणांचे अपील दाखल झाले आहे. यासंदर्भातील निर्णय येत्या दहा दिवसात घ्यावा लागणार असल्यामुळे रावल यांनी शुक्रवारी अपिलावरील सुनावणी ठेवली आहे. यासंदर्भातील नोटीस त्यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली.
उमेदवारांच्या अर्जांची छाननी वादावादी, तक्रारी आणि नाराजीनाट्यातच पार पडली होती. ही प्रक्रिया अनेकांसाठी धक्कादायक ठरली. विद्यमान संचालक सचिन शंकर डांगे, विजयकुमार पाटील, महादेव कोरे यांच्यासह माजी आमदार दिनकर पाटील, बाजार समितीचे उपसभापती जीवन पाटील, फळ मार्केटचे सभापती कुमार पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील अशा मातब्बरांचेही अर्ज उसाच्या नियमात बाद झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९० उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. छाननी प्रक्रिया संपली तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र होते. सत्ताधारी गटासह, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले.
आरक्षित जागांवरील उमेदवारांना उसाचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज वैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून गेले आहे. या निवडणुकीत आता कोणाचेही पॅनेल होऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्ज अवैध ठरविलेल्या पाचजणांनी साखर सहसंचालकांकडे अपील केले आहे. या सुनावणीकडे निवडणूक प्रक्रियेतील सर्व घटकांचे लक्ष लागून राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत येत्या १२ मे रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी छाननी प्रक्रियेसंदर्भातील अपिलावर निर्णय होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
काय आहे अपिलात?
सहकार कायद्यातील ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर उपविधी लागू असली तरी, कारखान्याच्या पहिल्या निवडणुकीसाठी ही उपविधी लागू होत नसल्याचेही याच कायद्यात म्हटले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार सुधारणा करण्यासाठी संबंधित कारखान्यांना थोडा कालावधी लागणार असल्याने, या नियमाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याला ही उपविधी पुढील निवडणुकांकरिता लागू होऊ शकते. घटना दुरुस्तीमधील या तरतुदीच्या आधारावर उमेदवार अनिल बाबासाहेब डुबल यांनी वकिलांमार्फत अपील दाखल केले आहे.