कृष्णेतील मासे मृतप्रकरणी ३१ रोजी हरित न्यायालयात सुनावणी; दत्त इंडिया कारखाना, महापालिकेवर कारवाईची मागणी
By शीतल पाटील | Published: March 29, 2023 07:35 PM2023-03-29T19:35:20+5:302023-03-29T19:35:45+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे
सांगली : कृष्णा नदीतील मासे मृतप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात ३१ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी. के. सिंग व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल, अशी माहिती ॲड. गौतम कुलकर्णी यांनी दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रकाश बालवडकर, अनिल बाळू मादनाईक, विश्वास बालीघाटे, शैलेश प्रकाश चौगुले, बाळगोंडा म्हदगोंडा पाटील यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत साखर कारखाना, सांगली महापालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी करण्यात आले आहे. ॲड. सरोदे यांच्यासह ॲड. गौतम रमाकांत कुलकर्णी, ॲड. सुघांशी रोपिया हे न्यायालयीन काम बघत आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखाना व स्वप्नपूर्ती डिस्टलरीतून रसायनमिश्रित मळी सोडल्यामुळे लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडले होते. तसेच महापालिकेकडून विना प्रक्रिया सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे मासे, नदीतील इतर जलचर प्राणी, नदीवर अवलंबून असलेले प्राणी- पक्षी, सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून काहीच कारवाई होत नसल्याने शेट्टी यांनी हरित न्यायाधीकरणाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करून प्रतिवादींच्या बेजाबदारपणामुळे झालेल्या त्रासाचा हिशोब होईल, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.