सांगली महापालिकेच्या घोटाळ्यांवरील सुनावणी आता पुढील वर्षी, विभागीय आयुक्तांचा अहवाल सादर
By अविनाश कोळी | Published: December 13, 2022 12:17 PM2022-12-13T12:17:30+5:302022-12-13T12:18:17+5:30
महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह तब्बल दहा प्रकरणातील अपहारांच्या चौकशी
सांगली : महापालिकेतील वीज बिल घोटाळ्यासह तब्बल दहा प्रकरणातील अपहारांच्या चौकशीप्रकरणी लोकायुक्तांसमोर मंगळवारी सुनावणी झाली. चौकशीचा अहवाल उशिराने प्राप्त झाल्याने आता या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी १५ फेब्रुवारी २०२३ ला ठेवण्यात आली आहे.
येथील नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर तानाजी रुईकर, रवींद्र चव्हाण यांनी महापालिकेच्या गैरकारभाराबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. महापालिकेच्या वीजबिलात ५ कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. वीज बिलांचे दहा वर्षाचे लेखापरीक्षण केल्यास हा घोटाळा १० ते १२ कोटींच्या घरात जाऊ शकतो.
२००१ ते २०१० या कालावधी महापालिकेच्या लेखा परीक्षणात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपाबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून वसुली करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ही बाब साखळकर यांनी लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती.
शेतकरी बँकेतील ठेवी, एचसीएल प्रकल्पासह विविध प्रकल्पाबाबत केलेल्या १० प्रकरणांची लोकायुक्तांनी दखल घेतली होती. जवळपास १०० कोटींचा हा अपहार आहे. सर्व प्रकरणांची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांना दिले होते त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी चौकशी पूर्ण करुन त्यांचा अहवाल लोकायुक्तांकडे सादर केला आहे.
मंगळवारी मुंबईत लोकायुक्तांसमोर सुनावणी झाली. यावेळी हा अहवाल उशिरा प्राप्त झाल्याने अहवालाचे अवलोकन करून सुनावणी घेणे वेळेअभावी कठीण असल्याचे सांगत १५ फेब्रुवारी तारीख देण्यात आली आहे.
लोकायुक्तांनी पाहिला सारांश
लोकायुक्त यांनी अहवालाचा सारांश पाहून तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीमध्ये बरेच तथ्य असल्याचे म्हणणे विभागीय आयुक्त यांच्या अहवालात असल्याचे सांगितले.