सांगली महापालिकेच्या महासभेत जोरदार वादावादी, नेमकं कारण काय?..
By शीतल पाटील | Published: June 20, 2023 07:17 PM2023-06-20T19:17:28+5:302023-06-20T19:18:19+5:30
काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मात्र या प्रस्तावाचे समर्थन केले
सांगली : महापालिकेच्या चार शाळा खासगी संस्थेकडे देण्यावरून मंगळवारी महासभेत जोरदार वादावादी झाली. महापालिकेच्या शाळांचे खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करीत काही नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध केला. तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मात्र या प्रस्तावाचे समर्थन केले.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सभा झाली. सभेत भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे यांनी चार शाळा खासगी संस्थेच्या भागीदारीतून चालविण्याची सूचना दिली होती. शाळेची इमारत व मैदानाची मालकी महापालिकेचीच राहील. महापालिकेचा शिक्षक शाळेचा मुख्याध्यापक असेल, असा प्रस्ताव होता.
काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील, भाजपचे जगन्नाथ ठोकळे, पांडुरंग कोरे, उर्मिला बेलवलकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने व योगेंद्र थोरात यांनी प्रस्तावास विरोध केला. मात्र, अखेर महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
गुंठेवारीतील आरक्षणाचा अहवाल मागविला
महापालिका क्षेत्रात गुंठेवारीचे प्रमाण वाढल्याचे काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी लक्ष वेधले. आयुक्त सुनील पवार यांनी त्याची दखल घेत आरक्षणाच्या जागेवरील गुंठेवारीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नगररचना विभागाचे सहायक संचालक झगडे यांना दिली.