सांगली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर, पुराची धास्ती कायम; कोयनेतून ५२,१०० क्युसेकने विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:20 PM2024-08-03T12:20:58+5:302024-08-03T12:21:42+5:30
: सांगलीत कृष्णेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता
सांगली : वारणा (चांदोली) व कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जाेर वाढल्यामुळे शुक्रवारी सकाळपासून कोयना धरणातून ५२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू झाला. यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणीपातळी दोन ते तीन फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांमध्ये पुराची धास्ती कायम आहे.
कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणीपातळी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ३९ फूट ९ इंच आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून कोयना धरणातून १० हजार क्युसेक्स विसर्ग वाढविला आहे. म्हणजे काेयनेतून ५२ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याकरिता रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. पाण्याची आवक वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये दोन ते तीन फूट वाढ होण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले.
वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरूच आहे. शिराळा तालुक्यातही पावसाचा जोर कायम असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाऊस आणि धरणातील विसर्ग लक्षात घेतल्यास वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका कायम आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील पाच हजार १४५ लोकांचे आणि पाच हजार ५१४ जनावरांचे स्थलांतर केले आहे.
धरणातील विसर्ग (क्युसेकमध्ये)
धरण - विसर्ग
कोयना - ५२,१००
धोम - ७८५६
कन्हेर - ४८४४
धोम बलकवडी - १४१५
उरमोडी - २९७३
तारळी - ४९६०
वारणा - ११,५३२
जिल्ह्यात सरासरी ८.६ मिलीमीटर पाऊस
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३१.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २ ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. : मिरज २.६ (४४७), जत १.५ (२७५.३), खानापूर ७.३ (३६२.२), वाळवा १३.९ (७२१.८), तासगाव ५.३ (४४६.६), शिराळा ३१.२ (११५६), आटपाडी ४.६ (२५८.७), कवठेमहांकाळ २.३ (३८६.९), पलूस १०.९ (५०२.८), कडेगाव ८.५ (४८७).