वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
By अशोक डोंबाळे | Published: September 21, 2024 09:57 PM2024-09-21T21:57:12+5:302024-09-21T21:57:44+5:30
उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला.
अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: मागील चार दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर शनिवारी सांगलीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावांत जोराच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सांगली शहरात मुसळधार पाऊस झाला. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे आठवडा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला.
जिल्ह्यात जुलै आणि ऑगष्टच्या सुरुवातीला मुसळधार बसरणारा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून गायब आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरणही राहिले, मात्र पावसाने हुलकावणी दिली होती. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झाला. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहा वाजल्यापासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली.
शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरुच राहिला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते.
चौकट
महिनाभर परतीचा पाऊस
राज्यात २१ सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल तो ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परतीचा पाऊस रब्बी हंगामास उपयुक्त ठरणार आहे. पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.