चांदोली धरणातून ९४४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग, अनेक पूल गेले पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:12 AM2022-08-10T11:12:34+5:302022-08-10T17:44:10+5:30
सलग तीन दिवस अतिवृष्टी
श्रीनिवास नागे
वारणावती (जि. सांगली) : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३८ मिलीमीटर तर दिवसभरात २० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून नऊ हजार ४४८ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या वक्राकार दरवाजातून ७७८४ क्युसेक व जलविद्युत केंद्राकडून १६६४ क्यूसेक असा एकूण ९४४८ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसर पावसाचे आगार समजला जातो. येथे वार्षिक चार ते पाच हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. यावर्षी ५ पाच जुलैपासून पावसास उशिरा सुरुवात होऊनही सलग दहा दिवस अतिवृष्टी झाली. आताही सलग तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. गेल्या चोवीस तासांत १३८ मिलीमीटर व दिवसभरात २० मिलीमीटर पावसासह एकूण १७४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. म्हणून विसर्ग वाढविण्यात आला होता. सध्या नऊ हजार ४४८ क्युसेकने आवक होत आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग वाढवून तो बुधवारी सकाळी ८ वाजेनंतर ९४४८ क्युसेक केला आहे. धरणातील पाणीसाठा ३१.०५ टीएमसी असून, त्याची टक्केवारी ९०.२६ अशी आहे. पाणी पातळी ६२३.९५ मीटर झाली आहे.
पावसाचे प्रमाण वाढल्यास आणखी विसर्ग कोणत्याही क्षणी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पिके पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत
धरणातील विसर्ग वाढविण्यात आल्याने वारणा नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. आरळा-शित्तूर पुलावर निम्म्या भागात थोडे पाणी आले आहे, तर काही भागात कोरडे आहे. चरण-सोंडोली पुलाला पाणी घासून जात आहे. कोकरूड-रेठरे पूल व मालेवाडी-सोंडोली पूल पाण्याखाली गेले आहेत. शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वाहतूक बंद झाली आहे तर आरळा-शित्तूर पुलावरून लोकांची ये-जा सुरू आहे.
वाळवा तालुक्यातील शिरगाव ते पलूस तालुक्यातील नागठाणे दरम्यानचा बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.