सांगली जिल्ह्यात धुवांधार पाऊस, चार सर्कलमध्ये अतिवृष्टी; खरीप पिकांचे मोठे नुकसान
By अशोक डोंबाळे | Published: September 24, 2024 01:09 PM2024-09-24T13:09:15+5:302024-09-24T13:10:27+5:30
सांगली : ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने सांगलीसह जिल्ह्याला झोडपून काढले. सांगली शहर जलमय होऊन ...
सांगली : ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री आणि सोमवारी दुपारी मुसळधार पावसाने सांगलीसह जिल्ह्याला झोडपून काढले. सांगली शहर जलमय होऊन रस्ते, चौकात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच तासगाव, मिरज, कडेगाव तालुक्यातील चार सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली असून ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत होते. जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात २५.९ मिलीमीटर पाऊस झाला.
जिल्ह्यात दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सांगलीसह बेडग, तासगाव, येळावी, कडेगाव तालुक्यातील नेवरी या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे परिसर जलमय झाला. जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होत असल्याने पुन्हा ओढे, नाले तलाव ओसंडून भरुन वाहू लागले आहेत.
शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले आहे. खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात भागात सोयाबीनच्या काढणी वेळीच पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या हाताला आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे.
चाेवीस तासातील तालुकानिहाय पाऊस (मिलीमीटर)
तालुका पाऊस
मिरज ४३.९
जत ११
खानापूर २४
वाळवा ३०.९
तासगाव ३३.४
शिराळा ३१.१
आटपाडी ४.४
क.महांकाळ १४
पलूस ३२.५
कडेगाव ४४.५
एकूण २५.९
येथे अतिवृष्टी
बेडग (ता. मिरज) सर्कलमध्ये ६६.८ मिलीमीटर, येळावी (ता. तासगाव) ७४.५, तासगाव ६७, नेवरी ६५.५ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे प्रशासनाने अतिवृष्टी जाहीर केली आहे. तसेच खानापूर तालुक्यातील करंजे ३६ मिलीमीटर, भाळवणी ५७.३, वाळवा तालुक्यातील ४३.८, तांदूळवाडी ४३.८, शिराळा ४०.३, पलूस तालुक्यातील अंकलखोप ४७.३, भिलवडी ४६.५ आणि वांगी (ता. कडेगाव) सर्कलमध्ये ४९.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.