Sangli: चांदोलीत अतिवृष्टी, जिल्ह्यात संततधार; वारणा नदी दुथडी, कृष्णेची पाणीपातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 05:10 PM2024-07-03T17:10:39+5:302024-07-03T17:15:02+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. चांदोली धरण परिसरात सर्वाधिक ८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चांदोली, ...

Heavy rain in Sangli district; The water level of Varana, Krishna river increased | Sangli: चांदोलीत अतिवृष्टी, जिल्ह्यात संततधार; वारणा नदी दुथडी, कृष्णेची पाणीपातळी वाढली

Sangli: चांदोलीत अतिवृष्टी, जिल्ह्यात संततधार; वारणा नदी दुथडी, कृष्णेची पाणीपातळी वाढली

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. चांदोली धरण परिसरात सर्वाधिक ८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. चांदोली, कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस चालू असून, वारणा, कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिराळा तालुक्यातील मेणी, येळापूर, पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

कोयना, चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये महाबळेश्वर १५५ मिलिमीटर, नवजा येथे ९७ मिलिमीटर, चांदोली धरण क्षेत्रात ८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक २२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

शिराळा तालुक्यातील मेणी, येळापूरसह पाचगणी परिसरात मंगळवारी अतिवृष्टी झाल्याने मेणी ओढ्याला पूर आला. येळापूर-समतानगर पुलावर दुपारपासून पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. कृष्णा नदीची पाणीपातळीही वाढली असून, सांगली आयर्विन पूल येथे मंगळवारी ७.०९ फुटांपर्यंत पाणी पातळी गेली होती. शिराळा, वाळवा तालुक्यासह पलूस, कडेगाव, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज, जत, आटपाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.

जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)
तालुका -पाऊस

  • मिरज - २.६
  • जत - ०.२
  • खानापूर - ५.३
  • वाळवा - ८.९
  • तासगाव - ३.५
  • शिराळा - २२.७
  • आटपाडी - २.८
  • क.महांकाळ - ०.९
  • पलूस - १.७
  • कडेगाव - ५.२
  • एकूण - ४.३


जिल्ह्यात आठवडाभर पाऊस

जिल्ह्यात दि. ३ ते ८ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस अखंडित चालू राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सांगलीत बंधाऱ्यावरून पाणी

कृष्णा नदीची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी ७.९ फुटांपर्यंत गेली होती. यामुळे कृष्णा नदीवरील सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहताना दिसत होते.

कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प

शिराळा-शाहूवाडी तालुक्याला जोडणारा कोकरूड-रेठरे वारणा बंधारा सोमवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. बंधारा बंद झाल्याने सध्या तुरुकवाडी आणि चरण या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. वारणा पाणलोट आणि धरण क्षेत्र व अभयारण्य परिसर तसेच डोंगर पठारावर दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने ओघळी, ओढे, नाली तुडुंब भरून वाहत आहेत. 

समतानगर पुलावर पाणी; वाहतूक ठप्प

शिराळा तालुक्यातील मेणी, येळापूरसह पाचगणी परिसरात मंगळवारी अतिवृष्टी झाल्याने मेणी ओढ्याला पूर आला. येळापूर-समतानगर पुलावर दुपारपासून पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. मंगळवारी दिवसभर शिराळा पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. दुपारपासून पावसाचा जोर वाढला. मेणी, येळापूरसह पाचगणी पठारावर अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. मेणी ओढ्याला पूर आल्याने येळापूर-समतानगर दरम्यानच्या पुलावर पाणी आले. परिणामी समतानगर, हाप्पेवाडी, कांबळेवाडी, दीपकवाडी या वाड्या-वस्त्यांकडे जाणारा रस्ता बंद झाला. यामुळे ग्रामस्थांची गैरसाेय झाली.

Web Title: Heavy rain in Sangli district; The water level of Varana, Krishna river increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.