सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, दुष्काळग्रस्त आटपाडीत ६१.२ मि.मी. पाऊस
By अविनाश कोळी | Published: September 1, 2022 03:39 PM2022-09-01T15:39:19+5:302022-09-01T15:40:00+5:30
दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यात तब्बल ६१.२ मि. मी. पावसाची नोंद
सांगली : गणेशोत्सवाच्या पहिल्या रात्रीच काल, बुधवारी सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यात तब्बल ६१.२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीसदृश पाऊस आटपाडीने अनुभवला. खानापूर-विटा, जत, पलूस, तासगाव व मिरज तालुक्यांनाही जोरदार सरी कोसळल्या.
सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या तुरळक सरींची हजेरी लागत आहे. अशातच गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी व रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. बुधवारी रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपले. प्रत्येक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवात यामुळे अडथळे निर्माण झाले.
आटपाडी शहर व परिसरात बुधवारी रात्री अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद झाली. तालुक्याच्या अन्य भागात मात्र पावसाचा जोर कमी होता. दुष्काळी जत, खानापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.
धरण क्षेत्रात जोर घटला
वारणा व कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात तुरळक पावसाची नोंद झाली. कोयना धरण क्षेत्रात १० व वारणा धरण क्षेत्रात ७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातच मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस मि. मी.
तालुका कालचा पाऊस एकूण
मिरज २३.९ ३४९
जत ३९ ३३२.७
खानापूर-विटा ४२.७ ४२१
वाळवा-इस्लामपूर २३.५० २.६
तासगाव ३९.९ ३६६.५
शिराळा १८.८ १०२८
आटपाडी ६१,२ ३०१.३
कवठेमहांकाळ १४.१ ४३८.८
पलूस ४८.९ ३३६.६
कडेगाव २४.८ ४११.९